नर्गिस यांनी राज कपूर यांच्यासोबत आग, बरसात, अंदाज, आवारा, आह, श्री ४२०, जागते रहो, चोरी चोरी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. या दोघांचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. याच दरम्यान त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मीडियात चांगल्याच रंगल्या होत्या. नर्गिस या केवळ १९ वर्षांच्या असताना त्या राज कपूर यांच्या प्रेमात पडल्या होत्या. पण राज कपूर यांचे लग्न झाले होते. त्यांना मुलं देखील होती. काहीही झाले तरी मी माझ्या पत्नीला सोडणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. यामुळे काही वर्षांनी नर्गिस राज कपूर यांच्या आयुष्यातून निघून गेल्या. या घटनेनंतर काहीच वर्षांच मदर इंडिया या चित्रपटाच्या सेटवर सुनील दत्त आणि नर्गिस यांची भेट झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एक अपघात झाला होता. या अपघातातून नर्गिस यांना सुनील दत्त यांनी वाचवले. त्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्याची चर्चा मीडियात होऊ लागली आणि त्यांनी लगेचच लग्न केले.
सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या आय़ुष्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकथा लोक देखील विसरून गेले होते. पण बॉबी या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी ऋषी कपूर या त्यांच्या मुलाला लाँच केले. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत डिम्पल कपाडिया झळकली होती. डिम्पल ही नर्गिस आणि राज कपूर यांची मुलगी असल्याने त्यांनी या चित्रपटाद्वारे तिला लाँच केले अशी अफवा त्या काळात पसरली होती. यामुळे नर्गिस यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.
संजय दत्तच्या अनऑफिशियल बायोपिक 'द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय संजय दत्त' या पुस्तकात लेखक यासेर उस्मान यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले आहे की, बॉबी या चित्रपटाच्या वेळी संजय दत्त हा खूपच लहान होता. त्यावेळी तो लॉसेन्स बोर्डिंग शाळेत शिकत होता. तेथील मुले त्याला या गोष्टीवरून टोमणे मारायचे. पण ही एक केवळ अफवा असल्याचे नर्गिन यांनी स्वतः सांगितले होते. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते की, या अफवा कोणी परवल्या याविषयी मला कल्पना नाही. पण घाणेरड्या वृत्तीच्या लोकांचे हे काम आहे. बॉबी या चित्रपटातील डिम्पलचा लूक हा काहीसा माझ्या लूकप्रमाणेच असल्याने या कथा रचण्यात आल्या आहेत. डिम्पल ही खूप समजूतदार आहे. तिने या अफवांकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले. तिच्याप्रमाणेच आमच्या कुटुंबियांना देखील या अफवांमुळे काहीही फरक पडलेला नाही.