ज्या कारणामुळे ब्रेकअप झाला, त्याच कारणामुळे नसीरूद्दीन यांना पहिला सिनेमा मिळाला!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:00 AM2021-07-20T08:00:00+5:302021-07-20T08:00:13+5:30
Naseeruddin Shah birthday : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारं एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. आज त्यांचा वाढदिवस.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरूद्दीन शाह (Naseeruddin Shah)यांचा आज वाढदिवस. गेल्या चार दशकांपासून अधिक काळ इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सरस भूमिका गाजवणा-या नसीर यांनी 230 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं. जुनून, आक्रोष, मासूम, सरफरोश, मोहरा, इक्बाल, द दर्टी पिक्चर, देढ इश्किया असे एक ना अनेक यादगार सिनेमे त्यांनी दिलेत. ( Naseeruddin Shah birthday )
नसीरूद्दीन यांचा एक खास चाहता वर्ग आहे. 1975 साली श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ या सिनेमापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरूवात झाली. आज या सिनेमाचा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खुद्द नसीर यांनी जयपूर लिट्रेचर फेस्टिवलमध्ये हा किस्सा सांगितला होता.
नसीरूद्दीन कधीही हिरो मटेरियल नव्हते. हे ते स्वत:ही कबुल करतात. गुड लूकिंग, चार्मिंग असा लुक ज्यावर तरूणी फिदा होतील, असे काहीही त्यांच्याकडे नव्हते. यासंदर्भातील एक किस्सा नसीरूद्दीन यांनी ऐकवला होता.
तर हा किस्सा आहे, नसीरूद्दीन यांच्या सिनेमात येण्यापूर्वीचा. नसीर यांच्या आयुष्यात एक मुलगी होती. होय, गर्लफ्रेन्ड. पण काही दिवसानंतर तिनं नसीर यांच्यासोबत ब्रेकअप केलं. कारण काय तर चेहरा.‘ तू बॉलिवूड हिरोसारखा सुंदर नाहीस’, असं म्हणत तिनं नसीरूद्दीन यांच्याशी ब्रेकअप केलं होतं. पण आश्चर्य म्हणजे, पुढे केवळ सुंदर नसल्यामुळंच नसीर यांना श्याम बेनेगल यांच्या चित्रपटात ब्रेक मिळाला होता. बेनेगल यांना त्यांच्या सिनेमासाठी जसा हिरो हवा होता, नसीरूद्दीन त्यात एकदम फिट बसत होते. सुंदर चेहरा नसल्यामुळं भलेही गर्लफ्रेन्डनं नसीरूद्दीन यांना सोडलं. पण याच चेह-यानं त्यांना त्यांचा पहिला सिनेमा मिळवून दिला होता.
वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या वयापेक्षा 15वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सीकरीसोबत लग्न केलं होतं. त्यांच्या पत्नी मनारा यांना परवीना मुराद या नावानेही ओळखले जाते. जेव्ह नसीर यांनी मनारासोबत लग्न करण्याची इच्छा घरातल्यांना सांगितली होती त्यावेळी त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.
घरातल्यांचा विरोध असतानाही नसीर यांनी मनारासोबत लग्न केलं. लग्नानंतर वर्षभरातच मनारा यांनी एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव नसीर यांनी हीबा शाह असं ठेवलं. त्यानंतर वर्षभरातच नसीर आणि मनारा यांच्यात खटके उडायला लागले. 1982मध्ये नसीर आणि मनारा यांच्यात घटस्फोट झाला. काही दिवसांनी मनारा आपल्या मुलीला घेऊन ईराणमध्ये निघून गेली. जेव्हा हीबा मोठी झाली त्यावेळी ती आपल्या आईला सोडून वडीलांकडे म्हणजे नसीर यांच्यासोबत राहू लागली. पुढे जाऊन हीबाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. सध्या ती आपले वडिल, सावत्र आई आणि सावत्र भावंडांसह राहते.
नसीर यांनी मनारा पासून विभक्त झाल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अॅक्टिंगचा कोर्स केला होता. येथूनच त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली. 1975मध्ये त्यांची भेट रत्ना पाठक यांच्यासोबत झाली. रत्ना त्यावेळी एक कॉलेज स्टुडंट होती. नसीर आणि रत्ना एका नाटकाच्या रिर्हसल दरम्यान भेटले होते. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या, दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं. 1982मध्ये या दोघांनी लग्न केलं. नसीर आणि रत्ना यांना दोन मुलं असून त्यांची नावं इमाद आणि विवान आहे.