ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (naseeruddin shah) सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. सध्याच्या काळात मुस्लिम लोकांचा द्वेष करणं ही फॅशन झाली आहे, असं ते म्हणाले असून त्याचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजच्या निमित्ताने इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नसीरुद्दीन शाह?
नसीरुद्दीन शाह यांनी या मुलाखतीमध्ये सध्याची परिस्थिती आणि समाजात निर्माण होणारी द्वेषाची भावना, सामाजिक तेढ यांविषयी भाष्य केलं. "सध्याच्या परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक आहे. मुस्लीम लोकांचा द्वेष करणं ही एक प्रकारची फॅशन झाली आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा असंच वागताना दिसून येतात. इतकंच नाही तर सध्याच्या सत्ताधारी पक्षानेदेखील अत्यंत हुशारीने ही गोष्ट त्यांच्या मनात, डोक्यात रुजवली आहे. आपण सेक्युलरिझम, लोकशाहीच्या बाता मारतो, तर मग प्रत्येक गोष्टीत धर्म आणायची काय गरज आहे?", असा प्रश्न नसीरुद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी यावेळी बोलत असताना निवडणूक आयोगावरही टीकास्त्र डागलं. मतासाठी धर्माचा वापर करणाऱ्या राजकारण्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग गप्प आहे. पण जर तेच एखाद्या मुस्लीम नेत्याने “अल्लाहू अकबर” या घोषणा देत मत मागितलं असतं तर आज चित्र फार वेगळं असतं. सगळा विनाश झाला असता.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी कोणत्याही पक्षाला, घटनेला वा सिनेमाला उद्देशून थेट वक्तव्य केलं नाही. मात्र, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ द करेळ स्टोरीनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीविषयी असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक घटनांवर थेट भाष्य केलं आहे. यात अनेकदा त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.