Join us

तर मी आत्महत्या करेन...! नसीरूद्दीन शाह यांचे धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:26 PM

नसीरूद्दीन यांना कशाची वाटतेय भीती?

ठळक मुद्देअभिनय क्षेत्रातील नवोदित कलाकारांबद्दलही ते बोलले. 

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये मोडणारं एक नाव म्हणजे नसीरुद्दीन शाह. अभिनयाइतकेच स्पष्टवक्तेपणा आणि परखड व्यक्तिमत्वासाठी नसीर ओळखले जातात. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडलेल्या नसीर यांनी कधीच बोलणे सोडले नाही. अगदी तसाच अभिनयाचा सरावही सोडला नाही. आजही, या वयातही रोज सकाळी उठल्यावर ते अभिनयाचा सराव करतात. अभिनय हा नसीर यांचा श्वास आहे, हे ते खुद्दही मान्य करतात. म्हणूनच अभिनय संपला तर मी सुद्धा संपेल, असे त्यांना वाटते. एका ताज्या मुलाखतीत ते यावर बोलले. अभिनय संपला तर मी सुद्धा स्वत:ला संपवेल, असे ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘अभिनय हा माझा श्वास आहे. माझ्यासाठी प्रेक्षकांना देण्यासारखे काही आहे, या एकाच विश्वासासोबत मी रोज उठतो. माझ्याकडे देण्यासारखे आहे आणि मी भाग्यवान आहे की, प्रेक्षक मला पाहू इच्छितात. आजही मी सकाळी उठल्यावर अभिनयाचा सराव करतो. एखादा पैलवान सकाळी उठून व्यायाम करतो, गायक भल्या पहाटे गाण्याचा रियाज करतो, अगदी त्याचप्रमाणे मी देखील न चुकता रोज सकाळी सराव करतो. माझ्या यशाचे रहस्य कदाचित याच अभिनयाच्या सरावात दडलेले आहे. अभिनय हे माझे वेड आहे. सकाळी उठून मी अभिनय करू शकलो नाही तर मी आत्महत्या करेन, असे मला अनेकदा वाटते. अभिनयाशिवाय आयुष्याची कल्पनाही मी करू शकत नाही.’

अभिनय क्षेत्रातील नवोदित कलाकारांबद्दलही ते बोलले. नव्या लोकांना सांगण्यासारखे, त्यांना प्रेरणा देण्यासारखे माझ्याकडे खूप काही आहे. गिरीश कर्नाड, ओम पुरी, श्याम बेनेगल, सत्यदेव दुबे या माझ्यासाठी आदर्श असलेल्या दिग्गजांचे अनुभव, त्यांची उदाहरणे माझ्याकडे आहेत. संघर्षाच्या काळात प्रोत्साहन गरजेचे असते. यासर्वांनी माझ्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका साकारली. हीच भूमिका नव्या कलाकारांच्या आयुष्यात साकारायची आहे.   आज मी अनेक नव्या कलाकारांना पाहतो. त्यांचा उत्साह पाहून मी आश्चर्यचकित होतो. परंतु त्यांना मी एक सल्ला देईन की दररोज सराव करा, असे ते म्हणाले.

टॅग्स :नसिरुद्दीन शाह