हिंदी सिनेमातील प्रभावशाली ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) त्यांच्या विधानांमुळेही अनेकदा चर्चेत असतात. सिनेमा, नाटक, राजकारण, सामाजिक विषय अशा प्रत्येक गोष्टींवर ते आपली मतं बिन्धास्तपणे मांडताना दिसतात. ऑफ बिट सिनेमांमुळे त्यांचा वेगळा चाहतावर्गही आहे. अगदी तरुण पिढीही त्यांची चाहती आहे. नुकतंच ते विमानतळावर दिसले तेव्हा त्यांचा भडकलेला अवतार दिसला. सेल्फी घेणाऱ्या चाहत्यांवर आणि पापाराझींवर ते चांगलेच संतापले.
73 वर्षीय नसीरुद्दीन शाह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. चेहऱ्याला मास्क, डोक्यावर टोपी गळ्यात गमछा अशा लूकमध्ये ते दिल्ली विमानतळावर दाखल झाले. तेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. सेल्फीसाठी आग्रह धरला. शिवाय पापाराझींचीही गर्दी होतीच. तेव्हा शाह यांना राग अनावर झाला आणि ते भडकून म्हणाले, "खूप चुकीचं काम केलं तुम्ही लोकांनी. डोकं खराब केलं. कुठेही जात असू तर एकटं सोडतच नाही तुम्ही कोणाला. समजत कसं नाही?' नंतर पापाराझींमधून एकाचा आवाज येतो, 'राहूदे यार, काही नका करु. ते नको म्हणत आहेत तर जाऊ द्या.'
नसीरुद्दीन शाह यांचा व्हिडिओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी त्यांची बाजू घेतली तर काही नेटकरी विरोधातही बोलले. 'अतिशय वाईट वागत आहेत. प्रेक्षकांमुळेच प्रसिद्धी मिळाली हे विसरलं नाही पाहिजे.','चेहरा तर खराबच आहे, कमीत कमी चांगलं तरी बोला.' अशा कमेंट्स आल्या आहेत. तर काहींनी म्हटले,'वयामुळे त्यांच्यावर परिणाम झालाय.'
नसीरुद्दीन शाह नुकतेच 'ताज' वेबसीरिजमध्ये दिसले होते. यामध्ये त्यांनी अकबरची भूमिका साकारली. सध्या ते 'शोटाईम' या नवीन प्रोजेक्टमुळे चर्चेत आहेत. त्यांचं कामावरचं प्रचंड प्रेम आणि दमदार अभिनय आजही प्रेक्षकांना भावतो.