Join us  

Ratna Pathak Shah : वर्कआऊटची टीम आहे, पण परफॉर्मन्सचं काय..., नव्या कलाकारांबद्दल रत्ना पाठक स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 4:31 PM

Ratna Pathak Shah : रत्ना पाठक शाह यांच्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. नव्या कलाकारांबाबत त्यांनी परखड वक्तव्य केलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सामाजिक अथवा राजकीय घटनेवर निर्भिडपणं मत मांडताना दिसतात. कधी त्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे वाद निर्माण होतो. त्यांच्या पत्नी रत्ना पाठक शाह या देखील तशाच परखड. सध्या त्या हॅप्पी फॅमिली नावाच्या मालिकेमुळे चर्चेत आहेत. याच मालिकेच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे. नव्या कलाकारांबाबत त्यांनी परखड वक्तव्य केलं आहे. हल्लीचे अनेक कलाकार चित्रपटांसाठी अव्वाच्या सव्वा मानधन घेतात. या पार्श्वभूमीवर त्या बोलल्या. आपल्या भूमिकेसाठी आजचे कलाकार जेवढे पैसे घेतात तेवढी कमाई त्यांच्या चित्रपटातून होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मी अनेक कलाकारांसोबत काम केलं. मात्र गेल्या काही वर्षात बाॅलिवूडमध्ये व्यवसायाच्या परिभाषाच बदलल्या आहेत. अनेक कलाकारांचं परावलंबित्व वाढत आहे. मी एका अभिनेत्याला विमानात बघितलं. त्याने न मागताच त्याच्या असिस्टंटने त्याला कॉफी आणून दिली. कॉफीचा कपही त्यानेच उघडून दिला. त्या अभिनेत्याने कॉफीचा एक घोट प्याला आणि कप पुन्हा असिस्टंटच्या हातात दिला. सगळं असिस्टंट करणार, मग तू काय करणार? तू काय तीन महिन्यांचं बाळ आहेस, स्वत:चा काॅफीचा एक कपही तू तुझ्या हातात पकडू शकत नाहीस? असं माझ्या मनात आलं. तुम्ही दुसऱ्यावर इतकं अवलंबून असाल तर कठीण आहे, असं त्या म्हणाल्या.

अनेक कलाकार जिमचं साहित्य, कुक, कॅटरर्स असा सगळा लवाजमा घेऊन प्रवास करतात. इतकं सगळं करता, पण तुमचा परफाॅर्मन्स काय? वर्कआऊटची टीम आहे, पण परफॉर्मन्सचं काय? तुमच्यावर खर्च झालेला पैसा बॉक्स ऑफिसवर वसूल तरी होतो का? तुमचा सिनेमा किती कमावतो ? असे सवाल त्यांनी केलेत. हा सगळा मला मूर्खपणा वाटतो. हा मूर्खपणा सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :नसिरुद्दीन शाहबॉलिवूड