भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच गेल्या वर्षी घटस्फोट घेत वेगळे झाले. लग्नानंतर ४ वर्षांतच त्यांचा संसार मोडला. हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. जुलै २०२४ मध्ये नताशा आणि हार्दिकने घटस्फोट घेतला. त्यानंतर ९ महिन्यांतच अभिनेत्री आता पुन्हा प्रेमाच्या शोधात आहे. नताशाला पुन्हा प्रेमात पडायचं आहे.
नताशाने नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने पुन्हा प्रेमात पडण्याची इच्छा बोलून दाखवली आणि यासाठी तयार असल्याचंही तिने सांगितलं. ती म्हणाली, "हे वर्ष खूप छान आणि स्पेशल आहे. कारण, मी आणि अगस्त्यने एकत्र खूप वेळ घालवला. त्याशिवाय माझ्या आवडत्या लोकांना मी भेटले. पण, गेल्या वर्षी आयुष्यात संकटं आली होती. या संकटांचा सामना करताना माझ्यातरी बदल झालेत. आणि मला ते आवडलेत. गेल्या वर्षी अनेक चांगले वाईट प्रसंग घडले. आपण प्रसंगांमधून आणि अनुभवातून शिकतो, असं मला वाटतं. याचा वयाशी काहीही संबंध नसतो".
"आता या वर्षातही मला अनेक अनुभव घ्यायचे आहेत. मग तो प्रेमाचाही असेल. मी पुन्हा प्रेमात पडण्याच्या विरोधात नाही. माझ्या आयुष्यात जे काही येईल ते सगळं मला अनुभवायचं आहे. योग्य व्यक्तींशी योग्य वेळेला आपल्या भावना जुळतात, असं मला वाटतं. विश्वास आणि समजुतीच्या जोरावर रिलेशनशिप तयार होतं. माझ्या आयुष्याचा हा प्रवास प्रेमाने पूर्ण व्हायला हवा", असंही नताशा पुढे म्हणाली.
दरम्यान, नताशा आणि हार्दिकने २०२०मध्ये लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांना अगस्त्य हा मुलगा झाला. २०२४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत.