बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांना, मालिकांना आणि जाहिरातींना संगीत देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया (Vanraj Bhatia )यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. 93 वर्षांच्या वनराज यांनी मुंबईत अंतिम श्वास घेतला. वनराज दीर्घकाळापासून वार्धक्याशी संबंधित आजारांशी लढत होते.31 मे 1927 रोजी जन्मलेले वनराज भाटिया यांनी लंडनच्या रॉयल अॅकेडमी आॅफ म्युझिक येथून संगीताचे शिक्षण घेतले होते. 1959 साली ते भारतात परतले आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करून लागले. सर्वप्रथम जाहिरातींसाठी जिंगल बनवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी सुमारे 7 हजारांवर जाहिरातींला जिंगल दिलेत.
1972 साली बॉलिवूडमध्ये त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. श्याम बेनेगल यांच्या ‘अंकूर’ या सिनेमासाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 1970,-80 च्या दशकामध्ये भाटिया यांनी विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांना संगीत दिले होते. त्यानंतर गोविंद निहलाणी, प्रकाश झा यांच्या चित्रपटांनाही भाटियांनी संगीत दिले. मंथन, भूमिका, कलयुग,जुनून, मंडी, त्रिकाल, द्रोहकाल, जाने भी दो यारो, सूरज का सातवा घोडा, तमस हे भाटिया यांचे उल्लेखनीय चित्रपट. अजूबा या एकमेव व्यावसायिक चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते. 1988 मध्ये त्यांना ‘तमस’ चित्रपटासाठी संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच 1989 या वर्षी त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि संगीत अकादमीतर्पे गौरविण्यात आले होते.2012 साली पद्मश्रीने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
‘लिरिल’चे सदाबहार संगीत...लिरिल साबणाची जाहिरात आणि त्याचे म्युझिक कुणीच विसरू शकत नाही. या जाहिरातीतील चेहरे बदलले. जाहिरातीतील नट्या बदलल्या, पण वनराज भाटियांनी कम्पोज केलेले संगीत मात्र अद्यापही सुरू आहे.