Join us

बॉलिवूडमधून संन्यास घेतल्यानंतर ही अभिनेत्री बनली गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 7:25 PM

या अभिनेत्रीने नव्वदीच्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या एका चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.

ठळक मुद्देमयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे. यापूर्वी मयुरी परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती.

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्री पदार्पण करत असतात. काहींना या क्षेत्रात यश मिळते तर काही या क्षेत्रात मिळालेल्या अपयशामुळे या चित्रपटसृष्टूपासून दूर जातात. पण बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने बॉलिवूडमधून संन्यास घेतल्यानंतर ती चक्क गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे. या अभिनेत्रीने मिळवलेल्या या यशाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. 

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मयुरी कांगो तुम्हाला आठवतेय का? पापा कहते है या चित्रपटातील घर से निकलते ही... हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्यात आपल्याला जुगल हंसराज आणि मयुरी कांगो यांना पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील मयुरीच्या अभिनयाचे कौतुक झाले नसले तरी तिच्या लूक्सची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. तिने या चित्रपटासोबतच नसीम या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच होगी प्यार की जीत, बेताबी, बादल यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील ती झळकली होती. गेल्या काही वर्षांपासून मयुरी चित्रपटांपासून दूर आहे. पण आता ती कुठे आहे आणि काय काम करत आहे हे तुम्हाला कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसणार आहे. मयुरी कांगो ही सध्या गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे. यापूर्वी मयुरी परफॉर्मिक्स डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती. ही कंपनी गुरगावमधील होती.  

मयुरीने महेश भट्टच्या 'पापा कहते है चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि मयुरी रातोरात प्रसिद्धी झोतात आली. तिने गेल्या काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, मी एकूण १६ चित्रपट केले होते पण त्यातले अर्ध्याहून अधिक प्रदर्शित झालेच नाही, १९९९  हे वर्ष अभिनेत्रीसाठी फारसे काही चांगले नव्हते. मला चित्रपटात झाडाच्या मागे पुढे डान्स करायला सांगायचे. मग मी पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्ष केंद्रित  केले. नंतर २००० मध्ये मी टीव्हीकडे वळली आणि काही वर्षानंतर लग्न करून मी यूएसला शिफ्ट झाले.

अभिनयक्षेत्र सोडल्यानंतर न्यूयॉर्कमधील ३६० आय या डिजीटल एजन्सीमध्ये मयुरी नोकरी करू लागली. त्यानंतर त्याच कंपनीत तिला मीडिया मॅनेजर या पदावर बढती मिळाली आणि आता तर ती गुगल इंडियामध्ये कार्यरत आहे.

टॅग्स :बॉलिवूड