६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (National Film Awards 2023) १७ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पार पडत आहे. २४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. आलिया भट, क्रिती सेनॉन आणि अल्लू अर्जुन यांसारख्या स्टार्सची नावे विजेत्या यादीत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)ला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiyawadi) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी तिने आनंद व्यक्त करत चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानले आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दूरदर्शन नॅशनल वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट म्हणाली की, "मला जे वाटतंय ते मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. मला खूप आनंद होत आहे. खूप वेगळी भूमिका मला साकारण्याची संधी मिळाली. मी आता संजय लीला भन्साळी यांना खूप मिस करत आहे. त्यांनी हा चित्रपट दिला, त्यासाठी मी त्यांचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहेत. हा माझा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यामुळे मी खूप आनंदीत आहे."
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. हा चित्रपट मागील वर्षी रिलीज झाला होता. हा चित्रपट वैश्याव्यवसाय करणाऱ्या गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारीत आहे. आलियाने यात गंगूबाईची भूमिका साकारली होती. यातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटात आलिया व्यतिरिक्त शंतनू माहेश्वरी आणि विजय राज यांनी देखील प्रमुख भूमिकेत होते.
आलिया भटच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर ती लवकरच जिगरा या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे.