आजचा (12 जानेवारी) दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत अभिनेता अजय देवगणने (Ajay Devgn) स्वत:च स्वत:ला पत्र लिहिलं आहे. या पत्रात 52 वर्षीय अजय 20 वर्षाच्या अजयशी बोलतोय.
1991 मध्ये ‘फूल और कांटे’ या सिनेमातून अजयचा डेब्यू झाला होता. अजय देवगणबॉलिवूडचे दिग्गज स्टंट डायरेक्टर वीरू देवगणचा मुलगा होता. पण तरीही करिअरमध्ये अजयला बराच मोठा स्ट्रगल करावा लागला. अनेक नकार पचवावे लागले. मात्र अजयने जिद्द सोडली नाही. आज म्हणूनच तो बॉलिवूडचा टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
अजय देवगणचं पत्र-
प्रिय २० वर्षीय मी,एक अभिनेता म्हणून तू या नव्या जगात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतोयस. मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, या प्रवासात तुला काही अत्यंत वाईट नकारांचा सामना करावा लागणार आहे. स्वभावाने थोडासा लाजरा असलेला तू याऊपरही या जगात स्वत:चं स्थान निर्माण करण्याचा, त्यात फिट होण्याचा खूप प्रयत्न करशील, पण त्यात तू अयशस्वी होशील. लोक टीका करतील, शंका घेतील आणि हे सगळं पचवणं कठीण असेल. त्यामुळे तुझ्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा अपयश तुझ्या हाती येईल. पण लक्षात ठेव, याचं फळ खूप चांगलं मिळेल. हळूहळू का होईना, एक दिवस तुला जाणवेल की, स्वत:चं अस्तित्व हीच तुझी सर्वातमोठी ताकद आहे. म्हणूनच, थोडासा अडखळलास तरी थांबू नकोस. तू प्रयत्न करत राहा आणि जगाच्या अपेक्षांना स्वत:वर लादू नकोस. जसा आहेस तसाच राहा. त्यातच तुझा खरेपणा आहे..., असं अजयने या पत्रात लिहिलं आहे.
डान्स कसा करायचा ते शिकून घे, तुला पुढे ते उपयोगी पडेल', असा सल्ला या पत्राच्या शेवटी 52 वर्षांच्या अजयने 20 वर्षांच्या अजयने दिला आहे. तुझ्यापेक्षा वयस्कर, थोडासा बुद्धिवान आणि थोडा तुझ्यापेक्षा चांगला दिसणारा..., असं त्याने आताच्या अजयचं वर्णन केलं आहे. अजयच्या या पत्रावर अनेक चाहत्यांच्या कमेंट्स प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर. लवकरच तो एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अजयचा मैदान, सर्कस, थँक्स गॉड या चित्रपटातही झळकणार आहे.