आज बॉलिवूडच्या सर्वोत्तम कलाकारांची यादी करायची म्हटले तर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हे नाव त्यात ठळकपणे उठून दिसेल. खरं तर नवाजकडे ना चेहरा होता, ना फिजिक्स. पण फक्त आणि फक्त दमदार अभिनयाच्या जोरावर नवाजने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अर्थात यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. आज नवाजचा वाढदिवस. तेव्हा जाणून घेऊ या, त्याच्याबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी... (Nawazuddin Siddiqui birthday)
पार्टटाईम सिक्युरिटी गार्डची नोकरी...नवाजुद्दीनने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे गिरवलेत. पण याऊपरही अॅक्टिंग करिअरमध्ये त्याला खूप मोठा संघर्ष करावा लागला. या काळात त्याने अगदी पार्ट टाईम सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीही केली. नवाज हा केमिस्ट्री विषयात ग्रॅज्युएट आहे. या क्षेत्रात त्याला मोठी संधी होती. पण त्याला अभिनयात रस होता. त्याने तेच केले.
त्या एका सीनने लाईफ बदलली...नवाजुद्दीनला सुरुवातीच्या काळात मिळायचे ते छोटे-मोठे रोल. कुणीच त्याला चांगल्या भूमिका देईना. पाकिटमार किंवा वेटर इतक्यात भूमिका त्याला ऑफर होत होत्या. पण अशाच एका छोट्याशा भूमिकेने, छोट्याशा सीनने त्याचे आयुष्य बदलले. होय, अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या सिनेमात असगर मुकादमची एक छोटीशी भूमिका त्याच्या वाट्याला आली. या छोट्याशा भूमिकेतही नवाजने असा काही जीव ओतला की, अनुराग कश्यप एकदम त्याच्यावर फिदा झाला होता.
कहां से आया है भाई तू?‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये असगर मुकादमची चौकशी सुरू असतानाचा तो सीन. नवाजने यात इतका जबरदस्त अभिनय केला की, अनुराग कश्यपही चाट पडला होता. कौन है भाई तू, कहां से आया है... असे शब्द त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडले होते. या सीननंतर अनुराग अक्षरश: नवाजच्या प्रेमात पडला होता. इतकेच नाही तर एकदिवस तू माझ्या सिनेमाचा हिरो असशील, असे वचनही त्याने त्याला दिले होते.
अन् अनुरागने शब्द पाळला...‘ब्लॅक फ्रायडे’ रिलीज होऊन सात वर्षे झाली होती. नवाजचा संघर्ष सुरुच होता. अचानक एकदिवस नवाजला अनुरागचा कॉल गेला. तयार हो, तुझ्यासाठी लीड रोल आहे, असे अनुराग नवाजला म्हणाला. हा रोल होता ‘गँग्स ऑफ वासेपूर’मधील फैजलचा. नवाजला त्याच्या कानावर विश्वास बसेना. अनुरागने शब्द पाळला होता आणि नवाज त्याच्या सिनेमाचा हिरो झाला होता.
तो रोलही यादगार...नवाजला विद्या बालन स्टारर ‘कहानी’त पोलिस अधिका-याची भूमिका ऑफर झाली होती. तेव्हाही नवाजला आश्चर्याचा धक्का बसला होता. मला आणि पोलिस अधिका-याची भूमिका? असा प्रश्न त्याला पडला होता. माझी बॉडी बघा, माझी देहबोली बघा आणि मग या रोलसाठी माझा विचार करा, असे त्याने मेकर्सला सांगितले होते. पण मेकर्सने तरीही हा रोल त्याला दिला आणि या रोलला नवाजने पूरेपूर न्याय दिला.