Nawazuddin Siddiqui on his new house in Mumbai: बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui)अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत, मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. मायानगरीत एक अलिशान बंगलाही उभारला. त्याच्या बंगल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. शाहरूखच्या ‘मन्नत’लाही लाजवेल अशा नवाजच्या या बंगल्याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. नवाजने आपल्या वडिलांच्या आठवणीत या बंगल्याला ‘नवाब’ असं नाव दिलं आहे. नवाजचं हे घर उभारण्यासाठी तीन वर्ष लागलीत. घराचं अख्ख इंटीरिअर नवाजुद्दीनने स्वत: डिझाईन केलं. एका ताज्या मुलाखतीत नवाज आपल्या या नव्या घराबद्दल भरभरून बोलला.
माझं घर होईल, असं वाटलं नव्हतं...मुंबईत माझं स्वत:चं घरं होईल, असा विचारही मी केला नव्हता. स्वत:चं घर असावं, खरं या संकल्पनेवर माझा फार काही विश्वास नाही. पण कोणीतरी प्लॉट दाखवला. गोष्टी सुरळीत घडत गेल्या आणि मी हा प्लॉट खरेदी केला. तो खरेदी केल्यानंतर मी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये आर्किटेक्चर व अॅस्थेटिक शिकलोय. फर्स्ट इअरला सीनिक डिझाईन हा विषयही मला होता, असं मला लक्षात आलं. मग हे घर मी स्वत:चं का डिझाईन करू नये, असा विचार डोक्यात आला. जितकं साधं तितकं आकर्षक, असा माझा विचार होता, असं नवाज मुलाखतीत म्हणाला. नव्या घरासाठी मी केवळ तीन रंगांचा वापर केला. चौथा रंग तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. वुडन, व्हाईट व स्काय ब्ल्यू असे ती रंग मी वापरले. घराच्या बाहेर एक गार्डन व केबिन आहे. तिथं बसून मी माझ्या स्क्रिप्ट वाचणार आणि विचार करणार, असंही त्याने सांगितलं.
अर्ध आयुष्य तर व्हॅनिटीत गेलं..नवं घर बनवायचं म्हटल्यानंतर त्यामागे कष्ट आलेच. लोकांनी माझा स्ट्रगल पाहिला आहे. कदाचित त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना आनंद झालाय. माझं म्हणाल तर, या नव्या घरात मी किती दिवस राहिल, माहित नाही. कारण अर्ध आयुष्य तर व्हॅनिटी व्हॅनमध्येच गेलं आहे. माझा बहुतांश वेळ सेटवर जातो. पण मला त्याबद्दल काहीही तक्रार नाही. कारण कामावर माझं मनापासून प्रेम आहे, असं तो म्हणाला.