Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या कसदार अभिनयानं अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. नुकतंच आंतरराष्ट्रीय अॅमी पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट परफॉरमन्स अॅक्टरसाठी नवाजुद्दीनला नामांकन देखील प्राप्त झालं आहे. 'सीरिअस मॅन' या चित्रपटासाठी नवाजुद्दीनला नामांकन मिळालं आहे. दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी 'सीरिअस मॅन' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नवाजुद्दीननं आजवर अनेक उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. अर्थात नवाजुद्दीनचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता.
"सुधीर सरांकडे चित्रपटाबाबतची खूप माहिती आहे. त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. ते वास्तविक परिस्थितीचा विचार करुन निर्णय घेतात आणि त्याच पद्धतीनं अभिनेत्रीची निवड करतात. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये आजही खूप वर्णद्वेष आहे. चित्रपटात इंदिरा तिवारी मुख्य भूमिकेत आहे. मला त्यांच्यासोबत काम करायला खूप मजा आली. यापुढील काळातही त्यांच्यासोब काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करेन. इंडस्ट्रीमध्ये वंशावादापेक्षा वर्णद्वेषाची समस्या खूप मोठी आहे", असं नवाजुद्दीन सिद्दीकी 'बॉलीवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये बराच काळ वर्णद्वेषाच्या समस्येचा सामना करावा लागला असंही नवाजुद्दीननं म्हटलं. येत्या काळात बॉलीवूडमध्ये डार्क स्किन अभिनेत्रींना संधी मिळेल आणि त्याही हिरोईन म्हणून नावलौकिक करतील अशी आशा आहे, असं नावाजुद्दीन म्हणाला. पण यात केवळ रंगरुपाची गोष्ट मी करत नाहीय. वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरुन इंडस्ट्रीमध्ये लोक खूप भेदभाव करतात. या गोष्टी जर संपुष्टात आल्या तर नक्कीच आपण चांगल्या चित्रपटाची निर्मिती करू शकू, मला बराच काळ माझ्या कमी उंचीमुळे आणि मी त्यांच्या नजरेत हिरो टाइप दिसत नसल्यामुळे नकाराला सामोरं जावं लागलं आहे, असंही नवाजुद्दीननं म्हटलं.
"मी याबाबत काही कुणाची तक्रार करू इच्छित नाही किंवा मी तशी करू शकत नाही. कारण मी माझी जागा आता इंडस्ट्रीमध्ये तयार केली आहे. पण माझं मत मी जे लोक अशा समस्येचा सामना करत आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. कारण असे बरेच लोक आहेत की जे उत्कृष्ट अभिनय करतात आणि मेहनती देखील आहेत. पण त्यांना नकाराला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील नकारात्मक वातावरणात अशा हरहुन्नरी कलाकारांनी अडकून जावं असं मला वाटत नाही", असं नवाजुद्दीन म्हणाला.