Join us

'...तिथे जेवायला गेलो म्हणून कॉलर पकडून बाहेर काढण्यात आलं', नवाजुद्दीनने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2023 9:41 AM

नवाजच्या आयुष्यातील तो धक्कादायक किस्सा ज्याने त्याचे चाहते भडकतील.

नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) म्हणजे बॉलिवूडमधील प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक. हटके भूमिका, जबरदस्त अभिनयाने त्याने कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. मध्यंतरी घरगुती वादांमुळे चर्चेत आलेला नवाज आता आगामी सिनेमांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनवेळी अनेक ठिकाणी त्याने आपल्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल माहिती दिली. त्याच्या संघर्षाच्या काळातील एका खुलाश्याने मात्र नवाजचे चाहते शॉक झालेत. 

नवाजुद्दीनने मुख्य भूमिका साकारण्यापूर्वी अनेक सिनेमांत छोटे छोटे रोल केले आहेत. आज त्याच्या जुन्या भूमिका पाहिलं तर तो नवाज आहे यावर विश्वासही बसणार नाही. नवाजने 1999 साली आमीर खानच्या 'सरफरोश' सिनेमातून पदार्पण केलं होतं हे खूप कमी जणांना माहित असेल. त्यात त्याचा छोटा रोल होता. मात्र सिनेमाच्या सेटवर त्याला कशी वागणून मिळाली याचा खुलासा त्याने बीबीसीशी बोलताना केला आहे.

कॉलर पकडून बाहेर काढलं

नवाजुद्दीन म्हणाला, "सिनेमाच्या सेटवर जेवणाची व्यवस्था ही वेगवेगळी असते. म्हणजेच स्टार्ससाठी वेगळं, छोट्या आर्टिस्टसाठी वेगळं, मेन आर्टिस्टसाठी वेगळं अशी व्यवस्था असते. काही प्रोडक्शन्समध्ये सगळे सोबत मिळूनही जेवतात.मात्र अनेकदा जेवणाच्या व्यवस्थेत तफावत दिसून येते. अनेकदा मी स्टार्स लोकांच्या एरिआत जाऊन जेवण करण्याचा प्रयत्न केला तर मला कॉलर पकडून बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हा फार अपमानित वाटलं."

दोन वेळचं जेवायलाही नसायचे पैसे

सिनेमांमध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारणाऱ्या नवाजने टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं. एक दिवस असाही आला जेव्हा त्याच्याजवळ एकही रुपया नव्हता. दिवसेंदिवस तो उपाशी राहिला. तेव्हा त्याने एका सीनिअर अभिनेत्याकडून ५० रुपये उधार घेतले होते. तेव्हा त्या सीनिअर अभिनेत्याचीही फारशी चांगली अवस्था नव्हती.ते सुद्धा दिवस ढकलत होते. त्यांच्याजवळ केवळ १०० रुपये होते ज्यातले ५० रुपये त्यांनी नवाजला दिले. 

नवाजकडे सध्या आहेत ८ चित्रपट

'पीपली लाईव्ह' आणि 'कहानी' सारख्या सिनेमांमधून नवाजला खरी ओळख मिळाली. तर 'गँग्स ऑफ वासेपूर' ने त्याचं नशीबच पालटलं. त्यानंतर नवाजने कधी मागे वळून बघितलं नाही.  यावर्षी नवाजचे 'हड्डी','सैंधव','अद्भुत','टिकू वेड्स शेरु','नूरानी चेहरा','बोले चूडिया', आणि 'संगीन'हे सिनेमे येणार आहेत. तर नुकताच त्याचा 'जोगिरा सारा रा रा' सिनेमा रिलीज झाला आहे. 

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकीबॉलिवूडसिनेमा