‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो...’, अशा खणखणीत उद्गगाराने हजारो सभा गाजवणारे आणि मराठी मनांवर अधिराज्य गाजविणारे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या डबिंगला सुरूवात झाली. खुद्द नवाजुद्दीनने ‘माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो आजपासून डबिंगची सुरूवात केली आहे...,’ अशा कॅप्शनसह डबिंगचा फोटो शेअर केला आहे.
या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका वठवण्यासाठी नवाजुद्दीनने प्रचंड मेहनत घेतली. चित्रपट हिंदीत असला तरीही या चित्रपटासाठी अगदी मराठी भाषा शिकण्यापासून तर त्याचे योग्य उच्चार शिकणे, बाळासाहेबांची देहबोली आत्मसात करण्यापर्यंतची तयारी नवाजुद्दीनने केली.‘ठाकरे’ नामक हा चित्रपट हिंदी साकारण्यात येणार असून शिवसेनाप्रमुखांचा अख्खा जीवनपट यात दाखवला जाईल. ‘बाळकडू’च्या सुपरडुपर हिट यशानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चार वर्षे खपून चित्रपटाचे लेखनही संजय राऊत यांनीच केले आहे. अभिजीत पानसे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.