बॉलिवूड कलाकार कायम त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि आलिशान गाड्या, घरं यांच्यासाठी ओळखले जातात. यात बॉलिवूडमध्ये असे असंख्य कलाकार आहेत. ज्यांच्याकडे एकाहून एक सरस अशा लक्झरी कार्स आहेत. विशेष म्हणजे कोणताही सेलिब्रिटी सार्वजनिक ठिकाणी दिसल्यावर चाहते त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी गर्दी करतात.त्यामुळेच ही कलाकार मंडळी शक्यतो त्यांच्या कारमधून बाहेर पडत नाहीत. मात्र, बॉलिवूडच्या एका सुपरस्टारने कोणत्याही अंगरक्षकाशिवाय चक्क मुंबई लोकल ट्रेनने प्रवास केला.
सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आहे. विशेष म्हणजे सामान्यांच्या गर्दीत प्रवास करत असताना एकाही व्यक्तीने नवाजला ओळखलं नाही. त्यामुळे हा व्हिडीओ चर्चेचा मुद्दा ठरत आहे.
नवाजने केला लोकल ट्रेनने प्रवास
नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या अपकमिंग चित्रपटामध्ये बिझी आहे. या चित्रपटाचं मीरारोड येथे चित्रीकरण सुरु आहे. याच काळात त्याला एका इव्हेंटमध्ये हजेरी लावायची होती. परंतु, हे ठिकाण चित्रीकरणापासून दूर असल्यामुळे त्याने वेळात कार्यक्रमाला हजेरी लावता यावी यासाठी चक्क रेल्वे ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, नवाजुद्दीनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याला डाऊन टू अर्थ असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याने परिधान केलेले कपडेदेखील सामान्यांप्रमाणेच वाटत असल्यामुळे तो आपल्यातील एक असल्याचं नेटकऱ्यांना वाटत आहे. नवाज लवकरच टीकू वेड्स शेरु या चित्रपटात झळकणार आहे.