नवाझुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने पोटगीमध्ये मागितले ३० कोटी आणि एक फ्लॅट, जाणून घ्या काय आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:06 PM2020-05-29T13:06:07+5:302020-05-29T13:09:48+5:30
आलियाने पोटगी म्हणून नवाझकडे ३० कोटी रुपये आणि एक 4 BHK फ्लॅट मागितला असल्याची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आला आहे. नुकतेच त्याचे घटस्फोटाचे वृत्त समोर आले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला व्हॉट्सअॅप आणि ईमेलवर घटस्फोटाची नोटिस पाठवून सगळ्यांना चकीत केले आहे. आता आलियाने पोटगी म्हणून नवाझकडे ३० कोटी रुपये आणि एक फ्लॅट मागितला असल्याची चर्चा रंगली आहे.
आलियाने इतकी मोठी रक्कम पोटगी म्हणून मागितली अशी चर्चा रंगली असताना तिने आता सोशल मीडियाद्वारे तिची बाजू मांडली आहे. आलियाने ट्वीटरवर ट्वीट करत सांगितले आहे की, मला पत्रकारांकडून गेल्या काही दिवसांपासून फोन येत आहेत. काही जण मला जे प्रश्न विचारत आहेत, ते ऐकून तर मला प्रचंड धक्का बसत आहे. मी त्यांना एकच सांगू इच्छिते की, या सगळ्या प्रकरणामुळे नवाजची छबी कोणत्याही प्रकारे खराब होऊ नये यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून या गोष्टीसाठी थांबले होते. नवाज जोपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलत नाही, तोपर्यंत मी या सगळ्या प्रकरणावर गप्पच बसणार आहे. तसेच मला एक गोष्ट सांगायची आहे की, मी माझ्या ट्विटर हँडलद्वारे कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाही अथवा खंडन करत नाही, तोपर्यंत मीडियाने माझ्यावर लावलेले कोणतेही आरोप चुकीचे आहेत असेच तुम्ही समजून घ्यावे...
आलियाचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आलियाने नवाझुद्दीनला नुकतीच घटस्फोटाची नोटिस पाठवली असली तरी ते दोघे जवळजवळ चार-पाच वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे आलियाने मीडियाला सांगितले आहे. आलियाने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, लग्न झाल्यापासूनच माझ्यात आणि नवाजमध्ये सगळे काही सुरळीत सुरू नाहीये. महिलांचा आदर कसा करायचा हे नवाज आणि त्यांच्या भावांना माहीतच नाहीये. आम्ही कधीही आमची भांडणं सोडवायला गेलो तर मी कशाप्रकारे चुकीची आहे हेच मला केवळ सांगितलं जायचं. त्याने मला अनेकवेळा लोकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली आहे. लोकांशी कशाप्रकारे वागायचे हे तुला माहीत नसेल तर तू गप्पच बसत जा... असे तो मला सुनवायचा. पत्नीला पतीने जो आदर देणे गरजेचा आहे, तो आदर मला कधीच मिळाला नाही.