अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट 'मंटो'साठी पाकिस्तानमधील सेट अहमदाबादमध्ये बनवण्यात आला आहे. 'मंटो' चित्रपट कवी सदात हसन मंटो यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात 'मंटो' यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारताना दिसणार आहे.
'मंटो' चित्रपटाची दिग्दर्शिका नंदिता दासला मंटो चित्रपटातील पाकिस्तानमधील भाग तिथे जाऊन चित्रीत करायचे होते. मात्र परवानगी न मिळाल्यामुळे पाकिस्तानचा सेट अहमदाबादमध्ये उभारण्यात आला आहे. हा चित्रपट स्वातंत्र्याच्या आधी व नंतरची कथा दाखवण्यात आली आहे. ऐतिहासिक काळ दाखवण्यासाठी सेटची गरज होती. त्यासाठी वास्तविक ठिकाण हवे होते. मात्र पाकिस्तानमध्ये शूटिंगसाठी परवानगी मिळाली नाही. म्हणून या चित्रपटाचा सेट बनवण्याची जबाबदारी कलादिग्दर्शिका रिटा घोषने घेतली.'मंटो'साठी रिटा घोषने पाकिस्तानमधील लाहौरचा सेट तयार केला. याबाबत रिटा म्हणाली की, 'जेव्हा पाकिस्तानमध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे समजल्यावर आम्ही चंदीगढ, लुधियाना व अहमदाबादमधील ठिकाण पाहिले आणि नंतर अहमदाबादमध्ये लाहौरचा सेट लावला. या ठिकाणी या सिनेमातील महत्त्वपूर्ण सीन चित्रीत केले जाणार आहेत. हा सेट बनवण्यासाठी संपूर्ण टीमला खूप मेहनत घ्यावी लागली आणि ही मेहनत रुपेरी पडद्यावर देखील पाहायला मिळेल. 'सादत हसन मंटो हे एक उर्दू साहित्यिक व लघुकथाकार होते. त्यांची कथा भारताची फाळणी, समाजातील दारिद्र्य, वेश्यावृत्ती, इत्यादी विषयांच्या आसपास फिरते. लिखाणातील अश्लीलतेच्या आरोपावरून त्यांना हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी व फाळणीनंतर असे एकूण सहा वेळा तुरुंगातही जावे लागले, परंतु त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. आपल्या ४२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी एकूण २२ कथासंग्रह, एक कादंबरी, व इतरही साहित्य लिहिले.