Join us

नवाजुद्दीनच्या ‘हरामखोर’ला ‘हिरवा कंदील’!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 4:16 PM

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या दोन बाबींमुळे प्रचंड चर्चेत आहे. एक म्हणजे ‘रईस’ मधील त्याची पोलिस अधिकाऱ्याची भूमिका आणि ...

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या दोन बाबींमुळे प्रचंड चर्चेत आहे. एक म्हणजे ‘रईस’ मधील त्याची पोलिस अधिकाऱ्याची भूमिका आणि दुसरी  बाब म्हणजे त्याचा हरामखोर चित्रपट जो नुकताच कायद्याच्या कचाटयातून सुटलाय. श्लोक शर्मा दिग्दर्शित चित्रपटाला ‘एफसीएटी’ कडून ‘हिरवा कंदील’ मिळाला आहे. नुकतेच या संस्थेने यू/ए असे प्रमाणपत्र देऊन चित्रपटावरील बंदी उठवली आहे. गुनीत मोंगा प्रोडक्शन बॅनर सिख्या एंटरटेनमेंट यांच्या आॅफिशियल पेजवर नुकतेच हे पोस्ट करण्यात आले आहे, ‘गुड न्यूज! श्लोक शर्मा यांच्या डेब्यू फिचर ‘हरामखोर’ चित्रपटावरील बंदी एफसीएटीकडून उठवण्यात आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट शूटिंगपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. चित्रपटाचे शूटिंग १६ दिवसात पूर्ण झाले असून, एप्रिल २०१५ मध्ये दिग्दर्शक श्लोक शर्मा यांच्याविरूद्ध बालभारती महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने एक तक्रार दाखल केली होती. ‘हरामखोर’ चित्रपटातील लोगो आणि प्रमोशन सीन्स वर मंडळाने आक्षेप घेतला होता. ‘१५व्या वार्षिक न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव’ आणि लॉस एंजलिस येथील भारतीय चित्रपट महोत्सवातही ‘हरामखोर’ चे स्क्रिनिंग करण्यात आले होते. या चित्रपटासाठी नवाजला ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये बेस्ट अ‍ॅक्टरचा किताबही मिळाला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि श्वेता त्रिपाठी या शिक्षक-विद्यार्थिनीच्या रोमान्सवर आधारित हा चित्रपट आहे. ‘सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशन’ने चित्रपटावर बंदी आणली होती. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आॅगस्टमध्ये ‘फिल्म सर्टिफिकेशन अपेलेट ट्रिब्युनल’ कडे धाव घेतली. नुकतेच या संस्थेने यू/ए असे प्रमाणपत्र देऊन चित्रपटावरील बंदी उठवली आहे.