साऊथ लेडी सुपरस्टार नयनताराने (Nayanthara) गेल्या 9 जूनला दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत (Vignesh Shivan) लग्नगाठ बांधली. तामिळनाडूच्या महाबलीपूरम येथे या जोडप्याचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. रजनीकांत, मणिरत्नम, सूर्या, ए. आर. रहमान, एटली असे साऊथचे दिग्गज या लग्नसोहळ्याला हजर होते. बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान यानेही लग्नाला हजेरी लावली होती. अलीकडे विग्नेशने लग्नाची One Month Anniversary सेलिब्रेट करत, लग्नाचे काही फोटो शेअर केले होते. पण आता याच फोटोंमुळे नयनतारा व विग्नेशची 25 कोटींची डिल कॅन्सल झाल्याचं कळतंय. (Nayanthara-Vignesh Shivan Wedding will not Telecast on Netflix: )
होय, न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, नयनतारा व विग्नेश यांच्या लग्नाचे स्ट्रीमिंग राईट्स नेटफ्लिक्सला 25 कोटी रुपयांना विकले गेले होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचं लग्न एखाद्या टीव्ही शोप्रमाणे पाहता येणार होतं. परंतु आता, नेटफ्लिक्सने ही डिल कॅन्सल केल्याचं कळतंय.
गेल्या महिन्यात झालेल्या या शाही विवाहसोहळ्यात सिनेसृष्टीतील काही मोजक्या दिग्गज सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण याच सेलिब्रिटींसोबतचे लग्नाचे फोटो विग्नेशने सोशल मीडियावर शेअर केलेत आणि डिल फिस्कटली. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या आनंदात विघ्नेश शिवनने शेअर केलेल्या फोटोंमुळे नेटफ्लिक्स नाराज झाले आणि त्यांनी या जोडप्याचे लग्न प्लॅटफॉर्मवर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
25 कोटींची डिल रद्द झाल्याने विघ्नेश आणि नयनताराला मोठा फटका बसला आहे. शिवाय जोडप्याच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ ओटीटीवर स्ट्रीम न झाल्याने या जोडप्यासह त्यांचे चाहतेही निराश झाले आहेत.