क्रुझ ड्रग्स प्रकरणी (Cruise Drugs Case) तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. यादरम्यान, त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिनंदेखील या प्रकरणावरून पलटवार केला आहे. क्रांती रेडकरनंसमीर वानखेडे यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून प्रत्युत्तर दिलं आहे. समीर वानखेडे केवळ देशसेवा करत आहेत, परंतु त्यांची प्रतीमा मलिन करणं हा आरोपांमागील उद्देश असल्याचं तिनं म्हटलं.
"आम्ही तुमच्या सोबत आहोत, स्ट्राँग राहा असं बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोक लपून मेसेज करत आहेत. ते सर्वजण सोशल मीडियावर येण्यासाठी घाबरत आहेत. असं केलं तर आपल्याला यापुढे चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, असं त्यांना वाटतंय. मगरीशी वैर का घ्यावं अशी भीती त्यांच्या मनात आहे," असं क्रांतीनं यावेळी सांगितलं. ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं यावर भाष्य केलं. समीर वानखेडे यांच्या जन्माचा जो दाखला व्हायरल होत आहे त्यावरही क्रांतीनं भाष्य केलं आणि तो बनावट असल्याचं म्हटलं.
बदनाम करण्याचा प्रयत्नमहाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची वैयक्तीक माहिती जाहीर करत त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद असल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा खोटा असल्याचं सांगत आपल्या कुटुंबाना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं वानखेडे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. यावरही क्रांती रेडकरनं नाराजी व्यक्त केली.
घाबरवण्याचे प्रयत्न"आज जे काही होतंय ते दु:खद आहे. त्यांना काही सिद्ध करायचं असेल तर ते केसशी निगडीत असलं पाहिजे, वैयक्तिक आयुष्याशी नाही. जे काही त्यांना सांगायचं असेल ते न्यायालयासमोर सांगावं. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. जर कोणी चुकीचं करत असेल तर त्याला जेलमध्येही पाठवता येऊ शकतं. परंतु हे सर्व सोशल मीडियावर का सुरूाहे. ही कोणती पीआर एजन्सी आहे, कोणी त्याना हायर केलंय, जे आम्हाला धमकी देत आहे, खुलेपणानं ट्रोल करत आहेत. जेव्हा तुम्ही ते तपासून पाहता तेव्हा ते खरे फॉलोअर्स नाहीयेत हे दिसून येतं. त्यांच्या शून्य फॉलोअर्स आहेत आणि शून्य ट्वीट्स आहेत. ते सर्व फेक अकाऊंट्स असून घाबरवण्यासाठी हे केलं जात आहे," असं ती म्हणाली.
आरोप करणं अयोग्य"जर पीव्ही सिंधू ऑलिम्पिक खेण्यास जातेय आणि तिला अचानक तू नाही खेळणार असं म्हटलं तर विचार करा कसं वाटेल? तसंच समीर यांच्यासोबत होत आहे. त्यांनी १५ वर्षांमध्ये इज्जत कमावली आहे. ही केस लवकरच संपणार आहे. परंतु त्यांच्यावर असे आरोप करणं आणि त्यांना केसवरून काढणं हे योग्य नाही. त्यांची प्रतीमा अतिशय स्वच्छ आहे. त्यांनी असं काही केलं असेल असं त्यांचा शत्रूही म्हणणार नाही. परंतु यांनी मर्यादाच ओलांडली आहे," असंही क्रांतीनं नमूद केलं.