बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta ) सध्या त्यांच्या चित्रपटामुळे नाही तर ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. यात त्यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. शिवाय बॉलिवूडमधील नव्या अभिनेत्रींना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. होय, विवाहित दिग्दर्शक किंवा निर्मात्यांसोबत कधीच शरीरसंबंध ठेवू नका असं नीना यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. ( Neena Gupta Relationship Advise)नीना यांच्या ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात ‘इफ आय कुड टर्न बॅक टाइम...’ नावाचा एक चॅप्टर आहे. यात त्या लिहितात, ‘कधीच विवाहित दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवू नका. हे तुम्हाला सामान्य वाटत असतं तरीही ठेवू नका. हे सर्वच करतात आणि ते स्वीकारलंही जातं. पण असं करून पुन्हा कधीच तुम्ही त्या दिग्दर्शक किंवा निर्मात्यासोबत काम करू शकणार नाही. कारण त्रासदायक ठरेल अशी कुठलीही गोष्ट कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला नको असते. तुम्ही त्याच्यासाठी अशीच त्रासदायक गोष्ट ठरू शकता.
तो तुमच्यासाठी स्वत:च्या पत्नीला कधीच सोडणार नाही. कारण तुम्ही त्याच्या आयुष्यातली पहिली स्त्री नसता. यात काही लोकांचा हेतू स्पष्ट असतो. पण काही जण तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. हे एक विद्यार्थी आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडल्यासारखं असतं. इंडस्ट्रीमध्ये त्याचं नाव आहे, म्हणून अनेकजणी यापुढेही हे करतील. कारण व्यक्ती आपल्या चुकांमधून शहाणा होतो आणि दुस-यांच्या चुकांमधून शिकणारे फार कमी आहेत. मला स्वत:ला आयुष्यात मागे जाऊन काही गोष्टी बदलणं शक्य असतं तर मी अनेक गोष्टी बदलल्या असत्या. पण हे शक्य नाही...