Join us

​ ‘फिर हेराफेरी’चे दिग्दर्शक नीरज वोरा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 4:09 AM

अभिनेते व दिग्दर्शक नीरज वोरा यांचे आज गुरुवारी पहाटे ४ वाजता निधन झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

अभिनेते व दिग्दर्शक नीरज वोरा यांचे आज गुरुवारी पहाटे ४ वाजता निधन झाले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. ‘फिर हेराफेरी’,‘खिलाडी ४२०’ सारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. अभिनेते परेश रावल यांनी टिष्ट्वट करत त्यांच्या निधनाची बातमी जाहिर केली. शिवाय त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. अभिनेते,दिग्दर्शक, निर्माता अशी ओळख असलेले नीरज वोरा गेल्या दहा महिन्यांपासून कोमामध्ये  होते.  नीरज   यांना गतवर्षी १९ आक्टोबरला हार्ट अटॅक आला होता आणि यानंतर ब्रेन स्ट्रोक आल्याने ते कोमात गेले होते.  एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु  होते. नीरज वोरा  यांच्या पत्नीचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांचे अतिशय जवळचे मित्र फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांची सगळी जबाबदारी उचलली होती. फिरोज नाडियाडवाला हेच त्यांची अपत्याप्रमाणे काळजी घेत होते. अलीकडे  फिरोज नाडियाडवाला यांच्या ‘बरकत विला’ या बंगल्यात त्यांना हलवण्यात आले होते. ११ मार्चपासून नादियाडवालांच्या घरातील एका रुमचे रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आले होते. विशेष म्हणजे रुममधल्या भिंतींवर वोरांच्या सिनेमांची पोस्टर्स आणि डीव्हीडीज लावण्यात आल्या होत्या. वोरा  यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी २४ तास नर्स, वॉर्डबॉय नियुक्त करण्यात आले होते.  याशिवाय फिजिओथेरपिस्ट, न्यूरो सर्जन, अ‍ॅक्यूपंक्चर थेरपिस्ट आणि जनरल फिजिशिअन असे सगळे दर आठवड्याला व्हिजिटवर यायचे. गत आॅगस्ट महिन्यात त्यांच्या तब्येतीत  सुधारणा झाल्याचे दिसून आले होते.‘कंपनी’, ‘पुकार’, ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘बादशाह’, ‘मन’ यासारख्या  ९० च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये नीरज वोरा  झळकले होते. ‘अकेले हम अकेले तुम’, ‘रंगीला’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’,‘जोश’, ‘बादशाह’, ‘हेरा फेरी’, ‘आवारा पागल दिवाना’ यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या लेखणीतून उतरले. कोमात जाण्यापूर्वी वोरा  यांनी ‘हेराफेरी3’वर काम सुरु केले होते. मात्र आजारपणामुळे त्यांनी हाती घेतलेला हा प्रोजेक्ट बारगळला.  ते थिएटरमध्येही सक्रीय होते. अलीकडच्या काळात ते आर्थिक तंगीत होते, असेही कळते.