बॉलिवूडचे शहेनशाह महानायक अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). वयाच्या 81 व्या वर्षीही त्यांचा कामाचा सपाटा सुरुच आहे. तरुणांनाही लाजवेल या वेगाने ते काम करतात. अख्खं जग त्यांना अमिताभ बच्चन नावाने ओळखत असलं तरी त्यांचं नाव आणि आडनाव दोन्ही आधी भलतंच होतं. काय आहे यामागची कहाणी जाणून घ्या.
मनोरंजनविश्वात नावाला खूप महत्व आहे. अनेक जण नाव बदलून फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्याही नावाचा इंटरेस्टिंग किस्सा आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचं खरं आडनाव 'बच्चन' नाही तर 'श्रीवास्तव' (Srivastava) आहे. वडील हरिवंशराय बच्चन यांनीच त्यांना हे नाव दिलं. एका मुलाखतीत बिग बी म्हणाले होते की, "बच्चन या आडनावावरुन तुम्ही आमचं जात ओळखू शकत नाही. हे बाबूजींनी मुद्दामून केले. बाबूजी उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील आहेत. त्यांनी शीख मुलीशी लग्न केले जी माझी आई आहे. जेव्हा माझी शाळेत अॅडमिशन होत होती तेव्हा माझं आडनाव लिहिताना बाबूजींनी श्रीवास्तवच्या जागी बच्चन लिहिले. कारण बाबूजींना तेव्हा बच्चन नावाने ओळखले जायचे. त्यांनी हेच नाव पुढे आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली."
ते पुढे म्हणाले, "माझे बाबूजी जातीवर विश्वास ठेवत नाहीत. म्हणून त्यांनी आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो की मी अशा कुटुंबात जन्माला आलो आणि बच्चन हे नाव मला मिळालं."
अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव होतं 'इंकलाब'. मात्र पुढे कवी सुमित्रानंदन पंत यांच्या सांगण्यावरुन त्यांचं नाव अमिताभ असं ठेवलं गेलं. यानंतर त्यांना अमिताभ बच्चन ही नवी ओळख मिळाली.