ओटीटीवर रिलीज ‘अभय 2’ या वेबसीरिजवरून सध्या ट्विटरवरचे वातावरण तापले आहे. होय, या वेब सीरिजमधील एक सीन सध्या वादाच्या भोव-यात सापडला आहे. या सीनमध्ये क्रिमिनल बोर्डवर शहीद खुदीराम बोस यांचा फोटो दिसतोय. हा फोटो पाहून नेटकरी खवळले आणि क्षणात #BoycottZee5 हा हॅटटॅग ट्रेंडमध्ये आला. या हॅगटॅगसह नेटक-यांनी Zee5 वर बहिष्कार टकाण्याची मागणी केली आहे.
शेम ऑन यू झी-5 इंडिया, हे खुदीराम बोस आहेत. 1908 च्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात कमी वयात शहीद झालेले स्वातंत्र्य सेनानी. जे येणा-या पिढ्यांसाठी धैर्य, हिंमत आणि बलिदानाचा वारसा सोडून गेलेत. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? भारत की ईस्ट इंडिया कंपनी? अशा संतप्त प्रतिक्रिया ट्विटरवर उमटल्या.
अन्य एका युजरनेही Zee5 वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. स्वातंत्र्य लढ्यात सर्वात कमी वयात शहीद झालेले खुदीराम बोस. 11 ऑगस्ट 1908 रोजी त्यांना फासावर चढवण्यात आले. त्यावेळी ते केवळ 18 वर्षांचे होते. यासाठी तुम्हाला माफी मागायला हवी, असे या युजरने लिहिले. ‘अभय 2’ या सीरिजमध्ये अभिनेता कुणाल खेमू मुख्य भूमिकेत आहे.
‘आम्ही यासाठी माफी मागतो. शोचे निर्माते, शो आणि आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. आम्ही अभय 2 मधील संबंधित दृश्यातील फोटो ब्लर केला आहे,’ असे चॅनलने स्पष्ट केले. अर्थात तरीही नेटक-यांचा संताप कमी झाला नाही. हा फोटो ब्लर करून चालणार नाही. तो पूर्णपणे डिलीट करावा आणि Zee5 ने जाहिर माफी मागावी, अशी मागणी युजर्सनी लावून धरली आहे.