विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. या सिनेमात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षभरापासून 'छावा'ची चर्चा होती. 'छावा'चा ट्रेलर अवघ्या काही तासांमध्ये लाँच होणार आहे. त्याआधी 'छावा'चं नवीन पोस्टर लाँच करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकीचा रुद्रावतार पाहायला मिळतोय. विकीचा हा लूक पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
'छावा'चं नवीन पोस्टर
मॅडॉक फिल्मस् यांनी 'छावा' सिनेमाचं नवीन पोस्टर लाँच केलंय. या पोस्टरमध्ये सुरुवातीला पृथ्वी, जल, अग्नी, वायू यांची उपमा देऊन संभाजी महाराजांची विविध रुपं पोस्टरमध्ये दाखवण्यात आलीय. या पोस्टरमध्ये विकी कौशल शंभूराजांच्या भूमिकेत पाण्यातून घोडेस्वारी करताना, हातात त्रिशूल घेऊन निशाणा साधताना, चिलखत परिधान करुन शत्रूंशी दोन हात करताना दिसतोय. अंगावर काटा आणणारं 'छावा'चं पोस्टर एकदम हटके आहे. आता सर्वांना छावाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. कारण ट्रेलरमधूनच सिनेमात छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याचा उलगडा होईल.
'छावा'चा ट्रेलर कधी होणार रिलीज?
'छावा' सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज होणार आहे. या ट्रेलरमधून सिनेमात कोणते कलाकार दिसणार, याचा उलगडा होईलच. 'छावा'मध्ये छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकणार आहे. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होतोय. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चंं दिग्दर्शन केलंय.