पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनवर भीक मागून पोट भरणारी रानू मंडल आज स्टार आहे. तिचा गातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने कमाल केली. या व्हिडीओने रानूला एका रात्रीत स्टार बनवले. केवळ इतकेच नाही तर रानू थेट बॉलिवूडच्या स्टुडिओत पोहोचली. हिमेश रेशमियाने रानूला गाण्याची संधी दिली आणि रानू स्टार झाली. आता रानूनंतर आणखी एका महिलेचा व्हिडीओ असाच व्हायरल होतोय. होय, कुण्या गावखेड्यातील या महिलेच्या आवाजाने नेटक-यांना वेड लावले आहे.व्हिडीओत गाणारी ही महिला कोण, कुठली हे कळायला मार्ग नाही. पण तिचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सुबोध घिलडीयाल नावाच्या एका युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.
‘या सुरेल आवाजाच्या महिलेला कोणी शोधू शकेल का? असे हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे. सुबोध यांच्या या ट्विटर पोस्टवर नेटक-यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या आवाजाचे कौतुक केले आहे. तिच्यातील गुणांना वाव मिळायला हवा, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
या व्हिडीओतील महिला महिला ‘ताज महल’ सिनेमातील ‘जो वादा किया वो’ हे गाणे गाताना दिसत आहे. लता मंगेशकर यांनी हे गीत गायलेले आहे. व्हिडीओतील या महिलेचा आवाज इतका सुरेल आहे की तिला गाताना ऐकल्यावर सर्वांना पुन्हा एकदा रानू मंडलची आठवण झाली.