रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. सिलसिला या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखाची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळाली नाही. त्या दोघांना पुन्हा एकदा स्क्रीनवर एकत्र पाहाण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण ही इच्छा कधी पूर्ण होईल असे वाटत नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे त्यांनी एकत्र काम न करणेच पसंत केले आहे.
जया बच्चन आणि अमिताभ यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते. त्या दोघांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दो अनजाने या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली असे म्हटले जाते.
रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चा गाजत असताना ही गोष्ट जया बच्चन यांच्या कानापर्यंत पोहोचली होती. रेखा आणि जया या एकेकाळी एकमेकांच्या खूप चांगल्या फ्रेंड्स होत्या. अमिताभ आणि जया यांच्या अफेअरची चर्चा सुरू असताना जया यांनी रेखा यांना जेवायला बोलावले होते. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मुंबईच्या बाहेर गेले होते, तीच संधी साधत जया यांनी रेखा यांना जेवायला घरी बोलावले. जया यांचा फोन आला तेव्हा रेखा प्रचंड घाबरल्या होत्या, त्या त्यांना काहीतरी सुनावतील असे त्यांना वाटत होते. पण त्यांनी प्रेमाने गप्पा मारत रेखा यांना जेवायला बोलावले.
रेखा घरी आल्यानंतर जया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये कुठेच अमिताभ यांचा उल्लेख देखील जया यांनी केला नाही. जेवण झाल्यानंतर जया यांनी रेखा यांना आपले घर दाखवले. तसेच रेखा घरी परतत असताना जया त्यांना दरवाज्यापर्यंत सोडायला देखील गेल्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सगळे काही बदलले. रेखा यांना निरोप देत असताना जया म्हणाल्या, काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही. ही गोष्ट ऐकून रेखा यांना चांगलाच धक्का बसला.
जया यांनी रेखा यांना डिनरला बोलावले ही बातमी त्याकाळात प्रसारमाध्यमात छापून आली होती. पण त्या दोघांनी याबाबत न बोलणेच पसंत केले होते. जया यांना सगळे कळले आहे याची जाणीव या घटनेमुळे अमिताभ यांना झाली आणि त्याचमुळे यानंतर रेखा यांच्यापासून दूर होणेच अमिताभ यांनी पसंत केले असे म्हटले जाते.