Join us

निलेश दिवेकर म्हणतोय, बॉलिवूडमध्ये चांगल्या भूमिका ऑफर आल्याशिवाय हिंदी चित्रपट करायचे नाही असे मनापासून ठरवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2016 6:04 PM

अभिनेता निलेश दिवेकर फेरारी की सवारी या चित्रपटानंतर आता अमोल गुप्तेंच्या चित्रपटात झळकणार आहे. फेरारी की सवारी या चित्रपटानंतर ...

अभिनेता निलेश दिवेकर फेरारी की सवारी या चित्रपटानंतर आता अमोल गुप्तेंच्या चित्रपटात झळकणार आहे. फेरारी की सवारी या चित्रपटानंतर जवळजवळ चार वर्षांनंतर तो हिंदी चित्रपट करत आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल आणि एकंदर कारकिर्दीबाबत त्याने सीएनएक्सशी मारलेल्या गप्पा...फेरारी की सवारी या चित्रपटानंतर तू कँडल मार्च, नटसम्राट, व्हेंटिलेटर यांसारख्या मराठी चित्रपटात झळकलास. पण इतके वर्षं तू बॉलिवूडपासून दूर का राहिलास?फेरारी की सवारी या चित्रपटात मी खूप चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर बॉलिवुडच्या चित्रपटात केवळ चांगलीच भूमिका साकारायची असे मी ठरवले होते. खरे तर विदू विनोद चोप्रा यांनी मला या चित्रपटानंतर तसा सल्ला दिला होता. हिंदी चित्रपटात महत्त्वाची आणि चांगलीच भूमिका असेल तर काम कर असे त्यांनी मला सांगितले होते. त्यांनी ही सांगितलेली गोष्ट मी चांगलीच लक्षात ठेवली. फेरारी की सवारीनंतर मला अनेक हिंदी चित्रपटाच्या ऑफर्स येत होत्या. पण भूमिका चांगली नसल्याने मी या चित्रपटांना नकार दिला. याउलट मराठीत मला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. त्यामुळे मी मराठीमध्ये जास्त रमलो.तू छोट्या पडद्यावर गुटर गूँ, कभी इधर कभी उधर यांसारख्या खूपच चांगल्या मालिकांमध्ये काम केले आहेस, पण सध्या तू छोट्या पडद्यावर झळकत नाहीस, याचे कारण काय?छोट्या पडद्यावर काम करायचे नाही असे मी स्वतः ठरवले आहे. मी आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे आणि यातील सगळ्याच व्यक्तिरेखा खूप चांगल्या होत्या आणि या सगळ्याच व्यक्तिरेखा खूप गाजल्या. पण आता छोट्या पडद्यावर तितक्या चांगल्या कॉमेडी मालिका बनवल्या जात नाहीत असे मला वाटते. या मालिकांच्या पटकथांमध्ये वाहिनींचा खूप ढवळाढवळ असतो हे मला पटत नाही. पूर्वी मालिकांचे चित्रीकरण केवळ दिवसातील सात तास चालायचे. पण आता बारा-बारा तास चित्रीकरण चालते. या सगळ्या गोष्टींमुळेच मी मालिका करत नाही. तू रंगभूमी, मालिका, चित्रपट सगळ्याच क्षेत्रात काम केले आहेस. या सगळ्यामध्ये कोणत्या माध्यमात काम करायला तुला अधिक आवडते?रंगभूमीवर काम करण्याची मजा काही औरच असते. कारण तिथे तुम्ही थेट लोकांच्यासमोर अभिनय सादर करत असता तर चित्रपटासाठी चित्रीकरण करताना तुम्ही एक दिवस जो अभिनय करत असता तोच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तशाच प्रकारचा आणि तितक्याच ताकदीचा अभिनय करावा लागतो. त्यामुळे मी रंगभूमी आणि चित्रपट अशी दोन्ही माध्यमे एन्जॉय करतो. अमोल गुप्तेंच्या आगामी चित्रपटात तू झळकणार आहेस. या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?अमोल गुप्तेंच्या चित्रपटातील माझी भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग असल्याने मी हा चित्रपट स्वीकारला आहे. या चित्रपटातील माझी भूमिका प्रेक्षकांना खूप आवडेल याची मला खात्री आहे.