हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्णकाळ गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचे काल निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या. सांताक्रूजला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निम्मी यांनी अनेक चित्रपटांत काम केले. पण60 च्या दशकातील या अभिनेत्रीला एक चूक तिला इतकी महागात पडली होती की, तिचे संपूर्ण करिअर संपुष्टात आले.
होय, 60 च्या दशकात निम्मी यशाच्या शिखरावर होत्या. राज कपूर, अशोक कुमार, धर्मेन्द्र असे अनेक स्टार्स त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सूक असत. राज कपूर तर एका चित्रपटात निम्मीच हवी म्हणून अडून बसले होते.
बरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी अपार लोकप्रियता मिळवली. पण एका चुकीमुळे त्यांचे करिअर संपुष्टात आले.
1963 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरे महबूब’ या चित्रपटात निम्मी यांना लीड हिरोईनचा रोल ऑफर झाला होता. दिग्दर्शक हरमन सिंह रवैल यांनी निम्मी यांना चित्रपटात लीड रोल दिला होता. पण निम्मी यांनी लीड रोलऐवजी सेकंड लीड रोल हवा म्हणून अडून बसल्या. लीड रोल सोडून त्यांनी राजेंद्र कुमार यांच्या बहीणीची भूमिका स्वीकारली. निम्मींच्या या हट्टापुढे दिग्दर्शकानेही हार मानली आणि सेकंड लीड रोल निम्मी यांना देऊन लीड रोलसाठी साधनाला साईन केले. चित्रपट रिलीज झाला आणि सगळेच उलटे झाले. या चित्रपटाने साधनाला स्टार बनवले आणि निम्मी यांच्या करिअरला ओहोटी लागली. यानंतर निम्मी यांना दुय्यम रोल ऑफर होऊ लागलेत.
‘पूजा के फुल’मध्ये निम्मी यांना आंधळ्या महिलेची भूमिका दिली गेली. याऊलट माला सिन्हा यांना लीड रोल दिला गेला. ‘आकाशदीप’मध्ये त्या लीड हिरो अशोक कुमार यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसल्या. पण या चित्रपटातही संपूर्ण फोकस धर्मेन्द्र आणि नंदा यांच्यावर होता. ‘मेरे महबूब’मध्ये बहीणीची भूमिका साकारल्याचा पश्चाताप निम्मी यांना अखेरपर्यंत होता.