सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जतमधील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांनी जीवन संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक चित्रपटांचे कला दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
नितीन देसाई यांनी 'लगान', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'दौड', 'रंगीला' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं होतं. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत नितीन देसाई यांनी बॉलिवूडमधील त्यांचे अनुभव सांगितले होते. लगान चित्रपटाचं शूटिंग करत असताना नितीन देसाईंना वडिलांना कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर त्यांना धक्का बसला होता. या मुलाखतीत त्यांनी भावनिक प्रसंग शेअर केला होता. "माझ्या वडिलांना कॅन्सर झाल्याचं आम्हाला अचानक समजलं. मी तेव्हा भूजमध्ये होतो. लगान चित्रपटाचा सेट तेव्हा मी तयार करत होतो. त्यावेळी तिथून एकच विमान येत होतं. आणि मला लगेचच निघायचं होतं," असं ते म्हणाले होते.
पुढे ते भावुक होत म्हणाले, "मी तिथून येऊ शकत नव्हतो. कारण, तिथून रेल्वे किंवा रस्त्याने त्यावेळी येता येत नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी विमानाने येण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. तेव्हा माझा ड्रायव्हर मला तेथील आशापुरा देवीच्या मंदिरात घेऊन गेला. मी एक कलाकार, साधा माणूस आहे. जर या जगात दैवी शक्ती असेल तर माझ्या वडिलांना वाचवावं. मी जाईपर्यंत माझ्या वडिलांना काहीही होऊ देई नको, असं साकडं मी घातलं होतं. मला वाटतं अशी शक्ती आहे. आणि आपण चांगल्या भावनाने गेल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. माझी बहीण डॉक्टर आहे. मी इकडे आलो तेव्हा ती मला हा दैवी चमत्कार आहे, असं मला म्हणाली. नंतर माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालं. आम्हाला आनंद झाला होता. पण, माझ्या वडिलांकडे फक्त चार महिने असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मी सकाळी उठायचो, फिल्मसिटीत जायचो. कौन बनेगा करोडपती, मिशन काश्मीर याचं काम तेव्हा चालू होतं. मी संध्याकाळपर्यंत काम करुन रात्री जसलोक हॉस्पिटलमध्ये जायचो. असं करत मी त्यांना जवळपास ११ महिने जीवनदान दिलं."
"लगान चित्रपटासाठी मला सगळे अवॉर्ड मिळाले होते. मला फिल्म फेअर आणि नॅशन अवॉर्ड या चित्रपटासाठी मिळाला होता. मी दोन राष्ट्रपतींच्या हातून चार नॅशनल अवॉर्ड घेतले होते," असंही त्यांनी सांगितलं होतं. 'लगान' हा नितीन देसाईंनी कला दिग्दर्शित केलेल्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अमीर खान मुख्य भूमिकेत आहे.