राज कपूर यांच्या आरके स्टुडिओत गेल्या अनेक वर्षांपासून गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन होते. संपूर्ण कपूर कुटुंब मिळून मनोभावे गणरायाची स्थापना, आराधना करतात. बॉलिवूड क्षेत्राशी संबंधीत लोकच नव्हे तर सामान्य लोकदेखील या गणेशाचे आवर्जून दर्शन घेतात. गेल्या 70 वर्षांपासून गणेशोत्सव आरके स्टुडिओत साजरा केला जात होता. पण आता आरके स्टुडिओ विकण्यात आला आहे.
पुढच्या वर्षी गणरायाचे आगमन या स्टुडिओत होणार नाही याची जाणीव असल्याने गेल्या वर्षी गणरायाच्या आगमनाच्यावेळी कपूर कुटुंब खूपच भावुक झाले होते. रणधीर कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, गणपती बाप्पाचे आगमन आमच्यासाठी नेहमीच खास असायचे. आरके स्टुडिओ कपूर कुटुंबियांच्या मालकीचा असेपर्यंत या वास्तूत गणपती बाप्पाला आणायचे असे आम्ही ठरवले होते. पण आता हा स्टुडिओ विकल्यानंतर यावर्षी कपूर कुटुंबियांकडून गणेशाची स्थापना केली जाणार नाहीये. अभिनेता रणधीर कपूर यांनीच ही गोष्ट नुकतीच मीडियाला सांगितली आहे.
कपूर कुटुंब दरवर्षी गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहायचे. पण या वर्षीचा गणेशोत्सव कपूर कुटुंबियासाठी खूपच वेगळा असणार आहे. याविषयी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रणधीर कपूर यांनी सांगितले, आमच्यासाठी गणेशाची स्थापना आरके स्टुडिओत करण्याचे गेल्यावर्षी शेवटचे वर्षं होते. आता आरके स्टुडिओच राहिलेला नाही तर गणेशाची स्थापना आम्ही कुठे करणार? माझे वडील राज कपूर यांनी गणेशाची स्थापना करण्याची परंपरा 70 वर्षांपूर्वी सुरू केली होती. त्यांची गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा होती. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेशाचे स्वागत आरके स्टुडिओतच करत आहोत. आमचा सगळ्यांचाच बाप्पावर प्रचंड विश्वास आहे. पण आता आम्ही ही गणेशोत्सवाची परंपरा पुढे चालू ठेवू शकत नाही असे मला तरी वाटते.
कपूर कुटुंब गणेशोत्सव नेहमीच धुमधडाक्यात साजरे करतात. ढोल, ताशांच्या गजरात दरवर्षी आरके स्टुडिओमध्ये गणपती बाप्पाचे आगमन व्हायचे. गणरायाच्या स्वागताला, विसर्जनाला नेहमीच कपूर कुटुंबातील सगळेच हजेरी लावत असत. आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कपूर कुटुंबीय गणरायाची सेवा करत असे.