कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नाहीये. त्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून या टप्प्यात काही गोष्टींवरचे निर्बंध कमी करण्यात येतील असे सरकारकडून सांगण्यात आले होते. ग्रीन झोनमधील काही इंडस्ट्री सध्या सुरू करण्यात आल्या असून त्यांना कडक नियम पाळावे लागत आहेत.
मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे चित्रीकरण आता लवकरच सुरू होणार असून चित्रीकरण करताना काही नियम कटाक्षाने पाळावे लागणार आहेत. पुढील काही नियम प्रत्येक सेटवर पाळणे बंधनकारक असणार आहेत.
चित्रीकरण सुरू झाल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी चांगल्या दर्जाचे मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत. हस्तांदोलन करणे, मिठी मारणे अथवा किस करणे या गोष्टी टाळणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एकमेकांमध्ये अधिकाधिक अंतर राखावे.चित्रपटाच्या सेटवर, प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसेसमध्ये, स्टुडिओमध्ये सिगरेट पिताना ती एकमेकांसोबत शेअर करू नये. सेट, ऑफिसेस वेळोवेळी सॅनिटाईज करावीत. चित्रीकरणाला उपस्थित असलेल्या लोकांची महिन्यातून एकदा चाचणी करणे अनिर्वाय असेल. साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. चित्रीकरण सुरू झाल्यावर सेटवर कमीतकमी तीन महिने तरी साठ वर्षांवरील लोकांकडून काम करून घेऊ नये. चित्रीकरणाच्या सेटवर चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी सगळ्यांना ४५ मिनिटं आधी तरी पोहोचावे लागेल.सेटवर स्वच्छ बाथरूम, वॉश बेसिंग उपलब्ध करून द्यावीत.केसाला वापरला जाणारा विग वापरण्याआधी आणि नंतर देखील धुवावा.प्रत्येकाने स्वतःचाच मेकअप किट वापरावा.मेकअपमन आणि हेअर स्टायलिस्ट यांनी सतत हातात ग्लोव्हज घालणे आणि मास्क घालणे बंधनकारक आहे.