भुलभुलैया हा विद्या बालन, शायनी आहुजा आणि अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील विद्या बालनचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. या चित्रपटात तिने साकारलेली मंजुलिका ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्याला नामांकन न मिळाल्याने तिला प्रचंड वाईट वाटले होते असे तिने नुकतेच सांगितले आहे. क्रिटिक्स चॉईस फिल्म अॅवॉर्डची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत झाली. त्यावेळी विद्याने ही गोष्ट सांगितली.
भुलभुलैया या चित्रपटात भुताने झपाटलेल्या मंजुलिका या स्त्रीची भूमिका विद्याने साकारली होती. 2007 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील विद्याच्या अभिनयाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. पण या चित्रपटासाठी नामांकन न मिळाल्याने विद्याला खूपच वाईट वाटले होते. याविषयी ती सांगते, त्या वर्षीच्या कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात मला भुलभुलैया या चित्रपटासाठी नामांकन मिळाले नव्हते. या चित्रपटात मी खूप चांगले काम केले होते असे अनेकांनी मला सांगितले होते. त्याचमुळे या चित्रपटासाठी मला नामांकन न मिळाल्याने मला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
विद्याला तिच्या चौदा वर्षांच्या करियरमध्ये आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कारांविषयी आपले मत व्यक्त करताना विद्या सांगते, मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे मी प्रचंड खूश आहे. आपण एका इंडस्ट्रीचा भाग असल्याने दुसऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे आपण कौतुक करणे गरजेचे आहे. कधीतरी तुम्हाला पुरस्कार मिळतो तर कधीतरी तुम्हाला न मिळता तो दुसऱ्या कोणाला तरी मिळतो. पण यासाठी कोणाचा द्वेष करू नये. तुम्हाला पुरस्कार मिळतो, त्यावेळी तुम्हाला नक्कीच आनंद होतो. पण दुसऱ्याला पुरस्कार मिळाल्यानंतर देखील तुम्ही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणे गरजेचे आहे.
क्रिटिक्स चॉईस फिल्म अॅवॉर्डची नामांकनं जाहीर झाली असून हा पुरस्कार सोहळा 21 एप्रिलला होणार आहे.