लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आॅस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीने मला काम देणेच बंद केले आहे. त्यामुळे मी पार कोसळून पडण्याच्या बेतात आहे, अशी वेदना प्रसिद्ध साऊंड डिझायनर रेसूल पूकुट्टी यांनी व्यक्त केली आहे.चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना उत्तर देताना पूकुट्टी यांनी टिष्ट्वटची एक मालिका जारी केली. त्यात त्यांनी ही वेदना व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रख्यात संगीतकार ए. आर. रेहमान यांनीही काम मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. आपल्याविरुद्ध बॉलिवूडमधील टोळी काम करीत आहे, असे रेहमान यांनी म्हटले होते. ए. आर. रेहमान आणि रेसूल पूकुट्टी यांना २००९ साली ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी आॅस्कर पुरस्कार मिळाला आहे. पूकुट्टी यांना साऊंड डिझायनिंगसाठी तर रेहमान यांना संगीतासाठी हा पुरस्कार मिळाला.शेखर कपूर यांनी रविवारी एक टिष्ट्वट केले होते. आॅस्कर पुरस्कार जिंकल्यामुळे रेहमान यांना हिंदी चित्रपटसृष्टीत अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे शेखर कपूर यांनी म्हटले होते. शेखर कपूर यांनी टिष्ट्वटमध्ये लिहिले की, ‘ए. आर. रेहमान, तुम्ही जाणता का तुमची समस्या काय आहे? तुम्ही आॅस्कर पुरस्कार जिंकला. आॅस्कर हे बॉलिवूडसाठी मृत्यूचे चुंबनच आहे. आॅस्करचा अर्थ असा होतो की, तुमच्याकडे बॉलिवूडला हाताळता येणार नाही, इतकी गुणवत्ता आहे.’शेखर कपूर यांच्या या टिष्ट्वटला उत्तर देणारे एक टिष्ट्वट रेसूल पूकुट्टी यांनी सोमवारी केले.हा तर ‘आॅस्कर शाप’!पूकुट्टी यांनी पुढे लिहिले की, काही मोजक्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. ते अजूनही माझ्यासोबत आहेत. आॅस्कर मिळाल्यानंतर मी सहजपणे हॉलिवूडला स्थलांतरित होऊ शकलो असतो; पण मी तसे केले नाही, करणारही नाही. भारतातील माझ्या कामानेच मला आॅस्कर पुरस्कार मिळवून दिला आहे. मला सहा वेळा ‘एमपीएसई’साठी नामांकन मिळाले आहे. जिंकलोही आहे आणि हे सर्व इथल्याच कामासाठी मिळाले आहे. तुम्हाला चिरडण्यासाठी लोक नेहमीच तयार असतात. तरीही माझा माझ्या लोकांवर कुणाहीपेक्षा अधिक विश्वास आहे.
ऑस्कर पुरस्कारानंतर बॉलिवूडमध्ये कोणीच काम देईना - रेसूल पूकुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 4:24 AM