Nora Fatehi : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. नोराच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात.सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. अभिनेत्री आणि डान्सर तर ती जबरदस्तच आहे. पण, एक व्यक्ती म्हणूनही ती भारी आहे. आपल्या मानलेल्या भावाच्या लग्न समारंभासाठी नोरा ही कोकण रेल्वेने प्रवास (Nora Fatehi Konkan Railway Journey ) करुन रत्नागिरीला पोहचली.
नोरानं संपूर्ण प्रवासाचा आणि हळदीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शमध्ये तिनं लिहलं, "माझा मानलेला भाऊ अनुपच्या हळदी समारंभाचा रत्नागिरीतील हा छोटा व्लॉग! समारंभासाठी आम्ही ट्रेन पकडून रत्नागिरीला पोहचलो. इतका सुंदर अनुभव. अनुप माझ्या आयुष्यात आणि टीममध्ये ८ वर्षांपासून आहे. तो 2017 पासून माझा प्रवास कॅमेऱ्याच्या मागून कॅप्चर करत आहे, आता तो कॅमेरासमोर आहे. प्रत्येकवेळी तो माझ्यासाठी उभा राहिला आहे. त्यासाठी मी सदैव कृतज्ञ. अनुप आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला लग्नाच्या खूप शुभेच्छा".
नोराचा दादर (Dadar) स्टेशन ते रत्नागिरी (Ratnagiri) असा प्रवास आणि हळद समांरभातील खास क्षण व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हि़डीओमध्ये नोरा म्हणते, "अगदी पहिल्यांदाच मी रेल्वेने प्रवास करतेय. मला कुणी ओळखू नये, यासाठी संपूर्ण चेहरा झाकला आहे. मी दादर स्टेशनवरून ट्रेन पकडली. सकाळचे ६ वाजले आहेत. आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलो. अनुप त्याच्या कुटुंबियांसोबत मला स्टेशनला घ्यायला आला आहे. मी अनुपच्या कुटुंबियांना पहिल्यांदा भेटतेय. अनुप ८ वर्षांपासून माझ्या टीममध्ये आहे आणि तो माझ्या भावासारखाच आहे. मी इथं सर्वांना भेटले. आम्ही डान्स केला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझी प्रामाणिक टीम माझ्यासोबत आहे".
नोराचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. नोराने कोणताही बडेजाव न करता एका सामान्य व्यक्तीप्रमाणे हळदी समारंभाचा आनंद लुटला. अनुपच्या कुटुंबियांनी तिला पाहुणी म्हणून एक सुंदर गुलाबी रंगाची साडीही दिली. तिनेही आनंदात ती साडी स्वीकारली. नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास तिनं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तसेच नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं.