Join us

नोरा फतेहीने मानले थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, म्हणाली, "मदतीचा हात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 15:43 IST

नोराने एका खास कारणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) हिने आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलंय. नोराच्या डान्स आणि फिटनेसवर चाहते फिदा आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारही तिच्या डान्सची स्तुती करतात. नोरा आणि डान्सर टेरेन्स यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नुकतंच नोराने एका खास कारणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत. काय आहे तिची पोस्ट?

उत्तर आफ्रिकेतील मोरक्को (Morocco) देशात भूकंपाने हाहाकार माजवला.या भीषण भूकंपात आतापर्यंत २ हजार लोकांचा जीव गेला आहे. टर्कीनंतर मोरक्कोमध्ये आलेल्या भूकंपाने जग हादरलं आहे. भूकंपाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. नोरा फतेही ही मोरक्को वंशाची असल्याने ती या घटनेमुळे खूप दु:खी झाली. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या एका ट्वीटमुळे तिने त्यांचे आभार मानले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत लिहिले, 'भूकंपामुळे मोरक्कोत  झालेल्या जीवितहानीने खूप दुःख झाले. या अडचणीच्या काळात माझ्या भावना मोरक्कन लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्यासाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात भारताकडून शक्य तेवढी मदत करण्यात येईल.'

पंतप्रधान मोदींचे हे ट्वीट रिपोस्ट करत नोराने लिहिले, 'या महत्नपूर्ण पाठिंब्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही त्या सुरुवातीच्या काही देशांमध्ये आहात ज्यांनी मोरक्कोसाठी मदतीचा हात पुढे केला. मोरक्कन लोक तुमचे ऋणी आहेत. जय हिंद!'

मोरक्कोमध्ये ६.८ मॅग्निट्यूडचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्र माराकेश शहरापासून ७२ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपात हजारो जणांचा जीव गेला आहे. तर अनेक लोक जखमी अवस्थेत आहेत. यामुळे मोरक्कोचे खूप नुकसान झाले आहे. यातून बाहेर यायला त्यांना बराच वेळ लागणार आहे. 

 

टॅग्स :नोरा फतेहीनरेंद्र मोदीभूकंप