Bhagyashree Birthday : 23 फेब्रुवारी, 1969 रोजी जन्मलेल्या भाग्यश्रीला ‘मैंने प्यार किया’ या सिनेमानं ओळख दिली. 1989 साली ‘मैंने प्यार किया’ रिलीज झाला आणि चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमात भाग्यश्रीने रंगवलेली सुंदर, सौज्वळ सुमन प्रेक्षकांना भावली. चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुकही झालं. पण अचानक भाग्यश्रीने लग्नाचा निर्णय घेतला आणि ‘सुमन’च्या करिअरला ब्रेक लागला. विवाहबंधनात अडकल्यानंतर तिने तीन चित्रपट केलेत आणि यानंतर, अभिनयातून ब्रेक घेतला. नाही म्हणायला 2001 साली तिने पुन्हा कमबॅक केलं. पण छोट्या-मोठ्या भूमिकांपलीकडे तिच्या वाट्याला काहीच आलं नाही. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, आज भाग्यश्रीचा वाढदिवस.
कदाचित अनेकांना ठाऊक नसेल पण ‘मैंने प्यार किया’ या सिनेमानं एका रात्रीत स्टार झालेल्या याच भाग्यश्रीला एक मराठी सिनेमा देखील ऑफर झाला होता. या सिनेमाचं नाव होतं 'माहेरची साडी'. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण 'माहेरची साडी' हा गाजलेला मराठी सिनेमा अलका कुबल यांच्याआधी भाग्यश्रीला ऑफर झाला होता. सासूकडून होणारा सूनेचा छळ, त्यातून तिचा झालेला दुखद अंत व भाऊ-बहिणीची माया असा मराठीतील आयकॉनिक 'माहेरची साडी' हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. अलका कुबलला या सिनेमानं अपार लोकप्रियता मिळवून दिली. आजही 'माहेरची साडी' हे नाव घेतलं तरी अलका कुबल यांचाच चेहरा समोर येतो. पण या चित्रपटासाठी अलका कुबल या पहिली पसंती नव्हत्या.
चित्रपटातील सोशिक लक्ष्मीच्या भूमिकेसाठी विजय कोंडके यांना भाग्यश्री हवी होती. त्यांना अलका कुबल यांच्या नावाला विरोध होता. त्यांनी भाग्यश्रीशी संपर्क साधला. तिला सिनेमात घेण्याचे बरेच प्रयत्नही केलेत. पण भाग्यश्री अखेरपर्यंत हो म्हणाली नाही. अखेर एन.एस. वैद्य, पितांबर काळे यांच्या आग्रहास्तव विजय कोंडके यांनी अलका कुबल यांचं नाव फायनल केलं आणि भाग्यश्रीची भूमिका अलका कुबल यांच्या वाट्याला आली. या सिनेमानं अलका कुबल या नावाला नवी ओळख दिली. आजही अलका कुबल माहेरची साडीची सोशिक नायिका म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात.