अभिनेता विकी कौशलने बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. गेल्या वर्षी विकी कौशलने 'राझी' व 'मनमर्जियां' सिनेमातील भूमिकेतून प्रेक्षकांकडून कौतूकाची थाप मिळविली आहे. या दोन्ही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता त्याचा बहुचर्चित चित्रपट उरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत ११ सिनेमात काम करून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र त्याला हवे तसे स्टारडम अद्याप मिळालेले नाही. त्याचा आगामी चित्रपट 'उरी' प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे स्टारडम वाढण्याची शक्यता आहे. विकीला अभिनेता म्हणून 'मसान' चित्रपटातून ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. 'मसान' सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे बोलले जाते. मात्र असे नसून मसान चित्रपटापूर्वी त्याने 'लव शव ते चिकन खुराना' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने कुणाल कपूरच्या बालपणीची भूमिका केली होती. त्यामुळे कदाचित विकी कौशल ओळखता आला नसेल. या चित्रपटानंतर 'मसान' हा चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला.
जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' सिनेमा आहे.
तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.