शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. २०१९ मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट आला होता. नवाजुद्दीन सिद्दिकीची प्रमुख भूमिका असलेला 'ठाकरे' चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला होता. चित्रपटासाठी नवाजनेही भरपूर मेहनत घेतली होती. त्यामुळे रुपेरी पडद्यावर साक्षात बाळासाहेब वावरतायत असा भास होत होता. पण तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, 'ठाकरे' यांच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती ही नवाजुद्दीन नव्हे तर इरफान खान होता. मात्र त्याचवेळी इरफानची तब्येत खराब झाल्यामुळे इरफानच्या जागी नवाजची निवड करण्यात आली होती.
इरफानला कॅन्सर झाल्यानंतर तो अनेक महिने उपचारासाठी परदेशात होता. त्याला प्रचंड अशक्तपणा जाणवत असल्याने त्याने चित्रपटांचे चित्रीकरण करणे बंद केले होते. केवळ परदेशातून परतल्यानंतर त्याने इंग्रजी मीडियम या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. हाच चित्रपट त्याचा अखेरचा चित्रपट ठरला.
नवाजुद्दीनप्रमाणेच अभिनेत्री अमृता रावसुद्धा मीनाताईंच्या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री रसिका दुग्गलला विचारण्यात आलं होतं. पण नवाजुद्दीनच्या आधीच्या ‘मंटो’ या सिनेमात रसिकाने भूमिका साकारल्याने दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यास सुरुवात करण्यात आली.
संपूर्ण चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेले बाळासाहेब प्रचंड प्रभावी वाटले होते. बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली होती. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे त्याने या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा अधोरेखित केले होते. अभिनेत्री अमृता रावनेही तिच्या वाट्याला आलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला होता. बाळासाहेब ठाकरे रुपेरी पडद्यावर रसिकांसमोर सादर करण्यात संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले होते. अनेक बारीकसारीक गोष्टी उत्तमरित्या मांडत पानसे यांनी आपलं दिग्दर्शक म्हणून कसब दाखवून दिलं होतं. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.