बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अभिनेत्री सोनम कपूरच्या दिल्लीतील निवासस्थानी काम करणाऱ्या एका नर्सला तिच्या पतीसह तिच्या घरातून २.४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी सांगितले की, अपर्णा रुथ विल्सन ही सोनम कपूरच्या सासूची देखरेख करत असे आणि तिचा नवरा नरेश कुमार सागर हा शकरपूरमधील एका खाजगी कंपनीत अकाउंटंट आहे. याआधी सोनम कपूर आणि तिचा उद्योजक पती आनंद आहुजा यांनी त्यांच्या नवी दिल्लीतील घरातून २.४ कोटी रुपयांच्या चोरीची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी सांगितले की चोरी 11 फेब्रुवारीला झाली आणि 23 फेब्रुवारीला तुघलक रोड पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील तक्रारदार सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या घराचा मॅनेजर होता. या घरात 20 हून अधिक लोक काम करतात. सोनम आणि तिच्या पतीच्या मॅनेजरने त्यांच्या घरातून २.४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेल्याची तक्रार केली होती. पोलिस उपायुक्तांनी सांगितले होते की, 11 फेब्रुवारीला चोरी झाल्याची माहिती मिळाली, मात्र त्यांनी 23 फेब्रुवारीला पोलिसांकडे तक्रार केली.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पथकासह मंगळवारी रात्री सरिता विहारमध्ये छापा टाकला. त्यांनी नर्स विल्सन आणि तिच्या पतीला अटक केली. दोघेही 31 वर्षांचे आहेत. चोरीचे दागिने व रोख रक्कम जप्त करणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, पुढील तपास सुरू असून अमृता शेरगिल मार्गावरील घरात काम करणाऱ्या बहुतेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे.