Join us

नुसरत भरुचा, ईस्राइली कलाकार अन् वाळवंटातील शूटिंग; 'अकेली'चा रंजक प्रवास

By तेजल गावडे | Published: August 23, 2023 7:37 PM

Akelli Movie : अभिनेत्री नुसरत भरुचाचा आगामी चित्रपट अकेलीचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा एका भारतीय तरुणीभोवती फिरते. जी युद्धग्रस्त इराकमध्ये एकटी अडकते आणि इतक्या अडचणी असतानाही जिवंत राहण्यासाठी संघर्ष करते.

अभिनेत्री नुसरत भरुचा(Nusrat Bharucha)चा आगामी चित्रपट 'अकेली'(Akelli Movie)चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटाची कथा एका भारतीय तरुणीभोवती फिरते. जी युद्धग्रस्त इराकमध्ये एकटी अडकते आणि इतक्या अडचणी असतानाही जिवंत राहण्यासाठी संघर्ष करते. यात नुसरत भरुचा आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अंदाजात दिसते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय मेश्राम(Pranay Meshram)ने केले आहे. तर निर्मिती निनाद वैद्य (Ninad Vaidya), नितीन वैद्य (Nitin Vaidya) आणि अपर्णा पाडगावकर (Aparna Padgaonkar), शशांत शाह (Shashant Shah) आणि विकी सिडना (Vicky Sidna) यांनी केली आहे. अकेली या चित्रपटाच्या माध्यमातून स्त्री शक्तीसोबतच स्वतःवर आणि स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा, असे सांगण्याचा प्रयत्न केल्याचे अपर्णा पाडगावकर यांनी सांगितले.

निर्मात्या अपर्णा पाडगावकर यांनी सांगितले की, स्वतःवर आणि स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा. असे म्हणतात ना की मांजरीला पण जर एका कोपऱ्यात ढकललं ती उलटून हल्ला करते. तसे माणसामधल्या छुप्या शक्ती असतात. कठीण प्रसंगात जेव्हा माणसाकडे कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही तेव्हा त्याची आंतरिक शक्ती जागृत होते. तो असामान्य बनू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, हेच सांगण्याचा प्रयत्न अकेलीतून करण्यात आला आहे. 

नुसरतच्या निवडीबद्दल...

अकेली चित्रपटात नुसरतने ज्योतीची भूमिका साकारली आहे. तिच्या निवडीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक प्रणय मेश्राम म्हणाले की, नुसरतची निवड केली कारण ती अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. अत्यंत ग्लॅमरस भूमिकेतूनही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आम्हाला वाटलं की ती या भूमिकेसाठी योग्य आहे. आतापर्यंत तिने अप्रतिम सिनेमात काम केले आहे. सिनेइंडस्ट्रीत तिचा कुणीही गॉडफादर नसल्यामुळे एकटीच्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर ती इथपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे ती या सगळ्या गोष्टींना रिलेट करु शकेल. खूप जमिनीशी कनेक्टेड असेलली अशी ती अभिनेत्री आहे. तिने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

या कारणासाठी केली ईस्राइली कलाकारांची निवड

या चित्रपटात ईस्राइली कलाकार त्साही हलेवी आणि अमीर बुट्रोस यांनी काम केले आहे. त्या दोघांनी फौदा या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यांनी अकेलीमधील भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यांच्याबद्दल अपर्णा पाडगावकर यांनी सांगितले की, ईस्राइली कलाकार घेण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ही गोष्ट घडते इराकमध्ये. इराकी वाटू शकतील अशा लोकांची निवड करण्याची गरज होती. जर भारतीय कलाकारांना घेतलं असतं तर ते वेगळेपण जाणवलं नसतं. त्यामुळे वास्तविक वाटण्यासाठी तिथले कलाकार घेण्यात आले. 

कौतुक करावं तेवढं कमीच

त्यांनी पुढे सांगितले की, त्साही आणि अमीर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच अप्रतिम होता. कारण ज्या पद्धतीने दोघांनी आपल्या कॅरेक्टरवर बारकाईने काम केले. दोन्ही अभिनेत्यांनी फौदा वेबसीरिजमध्ये काम केले आहे. एका अर्थाने ते आंतरराष्ट्रीय कलाकार आहेत. तसे नवखे नव्हते. त्यांनीही खूप प्रश्न विचारुन, नेमके काय अपेक्षित आहे हे विचारुन मगच या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांनी कोणतीच गोष्ट करायला नकार दिला नाही. चित्रपटात एक पाठलागाचा सीन आहे जो रात्री वाळवंटात शूट झाला आहे. त्यात त्साही हलेवीला उघडं राहायचं होतं. तो पूर्ण रात्रभर थंडीत वाळवंटात जिथे वारे वाहत होते तिथे त्याला धावायचे होते. तो सीन त्याने कोणतीही कटकट न करता दिले. त्याने या सिनेमात गाणं गायलं आहे. हे गाणं अरेबिक असून ते प्रेमावर आधारीत आहे. घडणारी घटना अगदी विरुद्ध आहे. त्यानेच ही कल्पना दिली आणि आम्ही त्याला होकार दिला. पण हे गाणे आणि सीन खूपच छान झाले आहे. तो माणूस किती विक्षिप्त आणि धोकादायक असू शकेल, हे त्यातून दिसते. त्यामुळे या कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

टॅग्स :नुसरत भारूचा