नुसरत यांची मुलगी निदाने उपस्थित केला कॉपीराईटचा मुद्दा, राहत फतेह अली खान यांनी दिले असे उत्तर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 6:01 AM
नुसरत फतेह अली खान आपल्या मागे सुफी शैलीतील माहिर असा कुणी शिष्य सोडून गेले असतील तर ते राहत फतेह ...
नुसरत फतेह अली खान आपल्या मागे सुफी शैलीतील माहिर असा कुणी शिष्य सोडून गेले असतील तर ते राहत फतेह अली खान आहेत. राहत फतेह अली खान यांनी ते वेळोवळी सिद्ध केले आहे. आज म्हणूनच राहत यांचे जगाच्या पाठीवर अमाप चाहते आहेत. केवळ पाकिस्तान वा भारतातचं नाही तर संपूर्ण जगात त्यांच्या नावाला एक वेगळे वलय आहे. स्वर्गीय काका उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्याकडूनच राहत यांनी गायकी शिकली. पण आता त्यांनाच काका नुसरत यांची गाणी गाण्यापासून रोखले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. होय, गत आठवड्यात नुसरत फतेह अली खान यांची मुलगी निदा हिने कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित केला होता. माझ्या वडिलांनी गायलेली गाणी अन्य गायकांनी गायल्यास ते कॉपीराईटचे उल्लंघन ठरेल आणि त्याला याबद्दल कॉपीराईट कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निदाने म्हटले होते. मुलगी या नात्याने मीच नुसरत फतेह अली खान यांची एकमात्र उत्तराधिकारी आहे. माझ्या वडिलांच्या गीतांचा कॉपीराईट केवळ माझ्याकडे आहे, असा दावाही तिने केला होता. निदाच्या या भूमिकेनंतर राहत यांनाही काका नुसरत यांची गाणी गाण्यासाठी निदाची परवानगी घ्यावी लागणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता. निदाच्या या भूमिकेवर राहत यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिले नव्हते. पण अलीकडे जिओ टीव्हीवरील एका कार्यक्रमात त्यांनी या मुद्यावरची चुप्पी तोडलीच.नुसरत फतेह अली खान यांची गाणी गाण्यासाठी आता तुम्हालाही निदाची परवानगी लागेल का? असा प्रश्न त्यांना केला गेला. यावर राहत फतेह अली खान यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘नाही़ आमच्या घराण्यात अद्याप असे काहीही घडलेले नाही. हा आमच्या घराण्याचा वारसा आहे. मी जेव्हा वाटेल, जिथे वाटेल तिने गाऊ शकतो. मला कुणाच्याही परवानगीची गरज नाही. कव्वाली व सुफी संगीतात हा ६०० वर्षे वा त्यापेक्षाही जुना असा समुद्ध वारसा आहे. माझे काका नुसरत यांनी माझेही पालनपोषण केले आहे. माझे वडील उस्ताद फर्रख फतेह अली खान आणि काका नुसरत फतेह अली खान यांनी माझे आजोबा व त्यांच्या पूर्वजांकडून हा वारसा मिळाला होता. आम्ही एक कुटुंब आहोत. या कुटुंबात कुठेही कटुता नाही. आम्ही कधीच विभागलो जाऊ शकत नाही,’असे राहत यांनी स्पष्ट केले. एकंदर काय तर नुसरत यांच्या गाण्यांचा कॉपीराईटचा मुद्दा आपल्याला लागू होत नाही, हेच जणू त्यांनी स्पष्ट केले.