बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार आगामी चित्रपट ‘गोल्ड’च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. १९४८ मध्ये हॉकी या खेळातील भारताच्या विजयासंदर्भात या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. त्यामुळे कथेत वास्तविकता यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. १९४८ मध्ये भारताने हॉकी या खेळात ज्या स्टेडियमवर विजय नोंदवला, त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली. ऑडसल स्टेडियमवरील त्या ऐतिहासिक विजयाचे चित्रीकरण करण्यासाठी ही प्रतिकृती उभारण्यात आली.
१९४८ मध्ये लंडन येथे पार पडलेल्या XIV ओलंपियाड खेळांमध्ये स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात भारताने पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. हीच कथा ‘गोल्ड’मध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गोल्ड’च्या ट्रेलर आणि गाण्यांना सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. भारतीय हॉकी संघाच्या या सुवर्ण कामगिरीचे क्षण चित्रीत करण्यासाठी तब्बल दोन हजार कलाकारांना सहभागी करण्यात आले आहे. यामध्ये भारतीयांसोबतच ब्रिटिश ज्युनियर आर्टिस्टनाही घेण्यात आले होते.‘गोल्ड’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे. या चित्रपटातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटात ती अक्षय कुमारच्या प्रियसीच्या भूमिकेत झळकणार आहे. रिमा कागती दिग्दर्शित ‘गोल्ड’ची निर्मिती एक्सेल एण्टरटेनमेन्ट करत आहे. अक्षय कुमारसोबतच यामध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंग, सनी कौशल आणि निकीता दत्ता यांच्याही भूमिका आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.