अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या 'ओह माय गॉड 2' (OMG 2) सिनेमाचं सध्या प्रचंड कौतुक होतंय. सेक्स एज्युकेशनवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाचा विषय पाहता सेन्सॉर बोर्डाने U/A सर्टिफिकेट न देता A सर्टिफिकेट दिले. यामुळे अल्पवयीन मुलांना सिनेमा पाहताच आला नाही. इतकंच काय तर सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला १६ वर्षीय बालकलाकार आरुष वर्मा (Aarush Varma) स्वत:चाच सिनेमा पाहू शकत नाहीए. याविरोधात त्याने याचिका दाखल केली आहे.
आरुष वर्माचा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. त्याने पंकज त्रिपाठीच्या मुलाची भूमिका केली आहे. लहानपणापासूनच त्याला अभिनयाचं वेड होतं. पहिल्याच सिनेमात त्याने अभिनयाची चुणूक दाखवली. मात्र दुर्दैव हे की त्याला आपलाच सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहता येत नाहीए. आरुष म्हणाला, 'सिनेमा पाहू शकत नाही याचं दु:ख आहे. हा माझा पहिलाच सिनेमा होता. कुटुंब, मित्र सगळेच खूप फिल्म बघण्यासाठी आतुर होते. जर तुम्ही फिल्म बघितली तर समजेल की लोकांना सेक्स एज्युकेशनसंदर्भात जागरुक करणं हाच उद्देश आहे. सिनेमात असा विषय उचलला आहे की ज्याविषयी मुलांना शिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे त्यांची समज वाढेल.'
तो पुढे म्हणाला, 'जर अशा सिनेमाला सेन्सॉर बोर्ड १८+ सर्टिफिकेट देत आहे तर हा चित्रपट बनवण्याचा उद्देशच संपतो. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायची माझी इच्छा होती. पण माझी निराशा झाली. A सर्टिफिकेटमुळे मी पाहू शकलो नाही. याहून जास्त दुर्दैव काय. 18 वर्षांखालील मुलं सिनेमा पाहू शकत नाही असं त्यात काहीच नाहीए. म्हणूनच मी कोर्टात याचिका दाखल केली आहे.'
११ ऑगस्ट रोजी 'ओह माय गॉड 2' रिलीज झाला. मात्र रिलीजच्या आधीच सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला होता. अनेकदा रिलीज डेट पुढे ढकलण्याचीही शक्यता दिसत होती. मात्र शेवटी सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला A सर्टिफिकेट दिले. यावर अक्षय कुमारसह इतरांनीही नाराजी व्यक्त केली. 'ओएमजी 2'ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.