Join us  

"अक्षय कुमारला कानाखाली मारा, १० लाख मिळवा”; कोणी अन् का दिली अशी ऑफर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 4:52 PM

अक्षय कुमारच्या 'OMG 2' चित्रपटामुळे वाद, अभिनेत्याला कानाखाली मारल्यास १० लाख देण्याची ऑफर

बहुचर्चित ‘ओएमजी २’(OMG 2) हा चित्रपट शुक्रवारी (११ ऑगस्ट) सर्वत्र प्रदर्शित झाला. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ओएमजी या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत आहे. त्याने चित्रपटात साकारलेल्या या भूमिकेवरुन आता वाद निर्माण झाला आहे. आग्रामध्ये या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने काढण्यात आली आहेत.

‘ओएमजी २’(OMG 2) चित्रपटातील अक्षय कुमारच्या भगवान शंकराच्या लूकवर आक्षेप घेण्यात आला आहे. अक्षयने हिंदू देवतांचा अपमान केल्याचं काही हिंदू संघटनांचं म्हणणं आहे. आग्रामधील हिंदू संघटना राष्ट्रीय हिंदू परिषदेकडून अक्षय कुमारच्या कानाखाली मारणाऱ्याला १० लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर अभिनेत्यावर थुंकणाऱ्यालाही १० लाखांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातून अक्षय कुमारने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शुक्रवारी आग्रामध्ये या संघटनेकडून अक्षय कुमारचे पोस्टर जाळण्यात आले. ‘ओएमजी २’(OMG 2) चित्रपटाला बॅन करण्याची मागणीही या संघटनेकडून करण्यात येत आहे.

राष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद पाराशर म्हणाले, “चित्रपटात अक्षय कुमार भगवान शंकराचा दूत दाखवला आहे. पण, त्याने शंकराचा अपमान केला आहे. तो चप्पल घालून फिरताना दिसतो. कचोरी विकत घेतो. तलावाच्या घाणेरड्या पाण्यात डुबकी मारतो. यामुळे भगवान शंकाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे.”

दरम्यान, अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’(OMG 2) चित्रपटातून महत्त्वाच्या अशा सेक्स एज्युकेशन विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ९ कोटींची कमाई केली आहे.

 

टॅग्स :अक्षय कुमारपंकज त्रिपाठी