२०२३ हे वर्ष बॉलिवूडचा किंग शाहरूख खान(Shah Rukh Khan)साठी प्रचंड कमाई करून देणारं ठरलं. त्याने ४ वर्षांनंतर असा काही कमबॅक केला की, त्याने अख्खं बॉक्स ऑफिसच हलवून सोडलं. ‘पठाण’,‘जवान’ नंतर आता त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट २१ डिसेंबरला रिलीज होतोय. २०२३ या एका वर्षांत १५०० कोटी रूपयांची बक्कळ कमाई करणारा शाहरूख हा पहिला अभिनेता ठरेल का? चला तर मग बघूयात, त्याचा कमबॅकनंतरचा प्रवास...
२०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपट आला. त्याच्या अपयशानंतर शाहरूखने थोडा ब्रेक घ्यायचा विचार केला. त्याच्यासाठी हा एक उत्तम निर्णय होता. चार वर्षांनंतर तो आला आणि त्याने सगळं जिंकलं. कमबॅकनंतरच्या ‘पठाण’ चित्रपटाने देशात ५४३.२२ कोटींचा गल्ला जमवला. सात महिन्यांनंतर रिलीज झालेल्या ‘जवान’ने ६०० कोटी रूपये कमावले. पठाण आणि जवान यांचे कलेक्शन मिळून ११८३.६४ कोटी शाहरूखने कमावले. भारतीय बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई करणारा शाहरूख हा दुसरा अभिनेता ठरलाय. २०१७ मध्ये प्रभासने एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली २’च्या निमित्ताने १०३१ कोटींची कमाई केली होती.
शाहरूख गाठणार १५०० कोटींचा टप्पा?‘पठाण’ आणि ‘जवान’ नंतर आता शाहरूख २१ डिसेंबरला ‘डंकी’ घेऊन येतोय. १५०० काेटींची कमाई पूर्ण होण्यासाठी त्याला आता केवळ ३१६.३६ कोटीच लागणार आहेत. जर डंकीने भारतात ३१६.३६ कोटींची कमाई केली तर शाहरूख हा २०२३ या एका वर्षात १५०० कोटींची कमाई करणारा पहिला अभिनेता ठरेल.