Join us

यश चोप्रा यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त 'YCF' शिष्यवृत्ती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 5:51 PM

यश राज फिल्म्स अंतर्गत यश चोप्रा फाउंडेशन (YCF) चे संस्थापक यश चोप्रा यांच्या ९२व्या जयंती निमित्ताने YCF शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या शुभारंभाची घोषणा केली.

Yash Chopra Foundation :  यश राज फिल्म्स अंतर्गत यश चोप्रा फाउंडेशन (YCF) चे संस्थापक यश चोप्रा यांच्या ९२व्या जयंती निमित्ताने YCF शिष्यवृत्ती कार्यक्रमाच्या शुभारंभाची घोषणा केली.

हा शिष्यवृत्ती कार्यक्रम विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीच्या अल्प उत्पन्न गटातील सदस्यांच्या मुलांना आर्थिक  सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हिंदी सिनेसृष्टीत बहुमुल्य योगदान देणाऱ्या नायकांचा विसर पडू नये, यासाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संधीचा लाभ केवळ त्याच मुलांना मिळेल ज्यांचे पालक चित्रपट युनियन्स/फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) चे नोंदणीकृत सदस्य आहेत. 

या उपक्रमाद्वारे पात्र उमेदवारांना त्यांच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. त्यात मास कम्युनिकेशन, फिल्ममेकिंग, प्रोडक्शन आणि डायरेक्शन, व्हिज्युअल आर्ट्स, सिनेमॅटोग्राफी आणि अ‍ॅनिमेशन यासारख्या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळेल. प्रति विद्यार्थी ५ लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक साहाय्य केले जाईल. ही यश चोप्रा फाउंडेशनकडून चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मुलांना पुढे जाण्याची आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी शिवाय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'YCF' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना 'YRF' चे सीईओ अक्षय विधानी म्हणाले, "दिग्गज चित्रपट निर्माता आणि आमचे संस्थापक यश चोप्रा नेहमी हिंदी चित्रपटसृष्टीला कोणत्याही प्रकारे योगदान देण्यावर विश्वास होता. त्यांचे हे विचार आम्ही या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून, त्यांच्या ९२व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मुलांना सशक्त करण्याच्या मिशनला सुरुवात करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की हा उपक्रम गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, शिवाय चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी मदत करेल."

निवडलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखत प्रक्रियेतून जावे लागेल, आणि यशस्वी अर्जदारांना या कार्यक्रमांतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाईल. अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि इतर माहिती मिळविण्यासाठी कृपया यश चोप्रा फाउंडेशनच्या वेबसाइटला भेट द्या किंवा contact@yashchoprafoundation.org वर ई-मेल करा.

टॅग्स :यश चोप्राबॉलिवूड