बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. बॉलिवूड सिनेमात शशिकला यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत त्यांनी ही आवड जोपासली. त्याचदरम्यान शशिकला यांच्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला आला. त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं. काकांनीच हे कारस्थान रचलं होतं असं शशिकला यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. घरच्या परिस्थितीमुळे शशिकला यांच्या वडिलांनी मुंबई गाठली. मात्र तिथंही जम बसवणं त्यांना कठीण होऊ लागलं.
त्यामुळेच शशिकला यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याची कामे केली. पुढे नूरजहाँ यांच्याशी शशिकला यांची ओळख झाली. त्यांचे पती शौकत रिझवी यांनी शशिकला यांना ‘झीनत’ चित्रपटात काम दिले. या भूमिकेसाठी त्यांना त्याकाळी २० रुपये मिळाले होते. या २० रुपयांत त्यांनी आपल्या भावंडाना नवीन कपडे घेतले, स्वतः ला २ साड्या घेतल्या. बऱ्याच वर्षानंतर अशी दिवाळी साजरी केली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. यानंतर शौकत रिझवी यांनी उर्दू शिकण्याच्या बोलीवर शशिकला यांच्याबरबर ३ वर्षाचा करार केला.
१९४७च्या जुगनू चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली आरती चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. या भूमिकेमुळे शशिकला यांनी पुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी शशिकला यांची समजूत काढून या भूमिकेसाठी तयार केले.
'आरती' चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फिल्मफेअरसारखे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर अशा चित्रपटात खलनायिकेच्या भूमिका त्यांनी साकारल्या. ओम प्रकाश सैगल यांच्यासोबत शशिकला यांनी प्रेमविवाह केला. शशिकला यांना दोन मुलीही झाल्या. पुढे त्याच त्याच खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. याचा परिणाम त्यांच्या सुखी संसारावर पडू लागला.वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादामुळे शशिकला यांनी आपल्या मुली आणि घरापासून दूर राहणे पसंत केले. एका व्यक्तीसह त्या परदेशात गेल्या. मात्र त्यानं फसवल्यानं शशिकला यांना जबर मानसिक धक्का बसला.
त्यामुळंच त्यांनी त्या काळात चारधाम, काशी अशा धार्मिक स्थळांना भेटीगाठी दिल्या. नंतरचा काही काळ त्या कलकत्त्यात मदर तेरेसा यांच्यासोबत राहून तिथल्या आश्रमात रुग्णांची सेवाही करू लागल्या. ९ वर्षे ही सेवा करून पुन्हा मुंबईला येण्याचे त्यांनी ठरवले. नव्याने चित्रपट क्षेत्रात येऊन आपला जम बसवत त्यांनी आजीच्या भूमिका खुबीने साकारल्या. छोट्या पडद्यावरील 'किसे अपना कहें', 'सोनपरी', 'जिना इसी का नाम है' मालिकेतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.